कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई, आरोपी गजाआड
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
पुण्यातील बनावट दारू दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे तातडीने बंद करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी केडगाव भागातील झेंडा चौकात मोठी नाकाबंदी करून एका संशयित चारचाकी वाहनावर झडतीची कारवाई केली.
या धडक कारवाईत पोलिसांनी बनावट दारू तयार करण्याचे साहित्य, रिकाम्या बाटल्या, झाकणे आणि बनावट लेबलसह मोठा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारचाकी गाडीचा क्रमांक एमएच १२ एचव्ही ४६७८ असा आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैभव बाळासाहेब जवक (रा. भूषण नगर, केडगाव) या आरोपीला अटक केली आहे. हा सर्व बनावट माल नाशिक शहरातून अहिल्यानगर जिल्ह्यात विक्रीसाठी आणण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दौंड, विजय ठोंबरे, विशाल दळवी, बोरगे, राहुल शिंदे, सत्यम शिंदे, महेश पवार, संकेत धीवर, रमेश शिंदे, सचिन लोळगे तसेच महिला पोलीस अंमलदार दरंदले आणि पल्लवी रोगले, तसेच विशेष विभागाचे राहुल गुंडू व अतुल कोतकर यांनी ही धाडसी कारवाई केली. या कामगिरीमुळे कोतवाली पोलिसांचे संपूर्ण जिल्ह्यातून मोठे कौतुक होत आहे.
प्लास्टिक पाईप खरेदीच्या बहाण्याने व्यापाऱ्याची सव्वा लाखांची फसवणूक; पारनेरच्या आरोपीविरुद्ध कोतवालीत गुन्हा दाखल
अहिल्यानगर: केडगाव औद्योगिक क्षेत्रातील एका प्रसिद्ध प्लास्टिक कारखान्यातून मोठी खरेदी करण्याचा बहाणा करून एक लाख बावन्न हजार पाचशे रुपयांचे प्लास्टिक पाईप घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बुरुडगाव रस्त्यावरील राजज्योती नगरचे रहिवासी आशुतोष विनोद बोथरा यांचा केडगाव औद्योगिक क्षेत्रात ‘मोहक ऍग्रो इंडस्ट्रीज’ नावाचा कारखाना आहे. एक जुलै ते दोन जुलै दरम्यान दीपक गुगाडे (राहणार नारायण गव्हाण, तालुका पारनेर) नावाच्या व्यक्तीने आशुतोष यांचे भाऊ ऋषभ बोथरा यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्याने आपल्याला शेतीसाठी तीन इंची सुमारे तीनशे पीव्हीसी प्लास्टिक पाईपची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. तसेच पाईप मिळताच सर्व पैसे त्वरित भरले जातील असा विश्वास दिला.
व्यापाऱ्याने विश्वास ठेवून दोन जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास १,५२,५०० रुपये किमतीचे तीन इंची २५० पाईप आरोपीच्या स्वाधीन केले. मात्र माल ताब्यात आल्यानंतर दीपक गुगाडे याने कोणताही आर्थिक मोबदला न देता आणि पैसे न चुकवता तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापारी आशुतोष बोथरा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी दीपक गुगाडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारांची धडक परेड; पोलीस अधीक्षकांचा भाईगिरी करणाऱ्यांना कडक इशारा
अहिल्यानगर – जिल्ह्यातील गुन्हेगारी पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी आणि शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक मोठी मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची एक विशेष परेड घेण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपाधीक्षक शिरीष ओमने, दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, गणेश वारुळे, तेजस्वी थोरात यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या परेडमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तब्बल २२० आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. तसेच उत्तर अहिल्यानगर भागातील १०० पेक्षा जास्त आरोपींचीही अशीच चौकशी करण्यात आली. या परेड दरम्यान पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुन्हेगारांना थेट ताकीद दिली की, त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती सोडून कायद्याचे पालन करावे.
पुन्हा कोणत्याही आरोपीने कोणाला धमकी दिली किंवा गुन्हेगारी कृत्य केले, तर त्यांची गय केली जाणार नाही. जे आरोपी या परेडला हजर राहिले नाहीत, त्यांना शोधून कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. विशेषतः सोशल मीडियावर स्वतःला डॉन दाखवणे किंवा शस्त्रांचे फोटो टाकून दहशत निर्माण करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. केवळ सोशल मीडियावरील पोस्ट किंवा कमेंट्सच्या माध्यमातून दहशत पसरवणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अहिल्यानगर जिल्ह्याला शांत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या सर्व्हरवर डाका टाकून ३७ लाखांची फसवणूक
अहिल्यानगर: संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ‘रियांश मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे सर्व्हर हॅक करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात सायबर चोरट्याने कंपनीच्या संगणक यंत्रणेत बेकायदेशीरपणे प्रवेश करून हा आर्थिक गैरव्यवहार केला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल किसन पावसे (वय ३३, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) हे या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. २९ जून रोजी सायंकाळी साडेचार ते साडेसहा वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात आरोपीने कंपनीचे सर्व्हर हॅक केले आणि कंपनीशी जोडलेल्या ७२ सदस्यांच्या बँक खात्यांची माहिती चोरली. त्यानंतर आरोपीने या सर्व सदस्यांचे खरे बँक खाते क्रमांक आणि बँक कोड बदलून स्वतःचे बनावट खाते क्रमांक तिथे टाकले.
अशा प्रकारे आरोपीने सदस्यांचे पैसे स्वतःच्या खात्यावर वळवून कंपनीची एकूण ३७ लाख ५६ हजार ५१२ रुपयांची मोठी फसवणूक केली. हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर व्यवस्थापक राहुल पावसे यांनी तातडीने पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे स्वतः करत आहेत. सायबर पोलीस आता तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. या मोठ्या चोरीमुळे जिल्हाभरातील व्यापारी आणि व्यावसायिक वर्गात खळबळ उडाली असून डिजिटल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पैसे न दिल्याने माळीवाड्यात सख्ख्या भावावर दगडफेक अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण; एकावर गुन्हा दाखल
अहिल्यानगर: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून सख्ख्या भावाची गचांडी धरून, लाथाबुक्क्यांनी आणि पायावर दगड मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना माळीवाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळीवाडा येथील मार्केटयार्ड रोडवर राहणारे प्रशांत शिवाजी लोखंडे हे आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी आरोपी तेजस प्रशांत लोखंडे याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपीने रागाच्या भरात प्रशांत यांची कॉलर पकडली. फिर्यादी आपली कॉलर सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपीने त्यांना लाथाबुक्क्यांनी पोटात आणि तोंडावर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
एवढ्यावरच न थांबता आरोपी तेजस याने प्रशांत यांच्या गालाचा चावा घेतला आणि जमिनीवर पडलेला मोठा दगड त्यांच्या पायावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत जखमी झालेल्या प्रशांत यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रशांत लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी तेजस लोखंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र औटी करत आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून ६५ वर्षीय वृद्धाची साडेतेरा लाखांची फसवणूक; ५ जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर : भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १३ लाख ७५ हजार ६८० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरदेवळे येथील आलमगीर रस्त्यावरील रहिवासी आणि सेवानिवृत्त झालेले ६५ वर्षीय गोरख रघुनाथ लिपारे यांनी या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हुसेन शहाबुद्दीन पठाण (रा. गंगापूर, छत्रपती संभाजीनगर), दिनेश बबनराव लहारे (रा. आरणगाव, अहिल्यानगर), कमलेश पदमाकर गांधीलकर ऊर्फ आदित्य कुलकर्णी (रा. मालेगाव, नाशिक), जावेद अब्बास पटेल आणि अब्बास पटेल (दोघे रा. गंगापूर, छत्रपती संभाजीनगर) अशा पाच आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे.
हा सर्व प्रकार २० ऑक्टोबर २०२१ ते १३ सप्टेंबर २०२२ या कालावधीत घडला. आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी आरोपींनी बनावट कार्यालयीन आदेश तयार केले आणि त्यावर खोटे शिक्के मारून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. या बदल्यात आरोपींनी वेळोवेळी फिर्यादीकडून साडेतेरा लाखांपेक्षा जास्त रक्कम उकळली. मात्र, पैसे घेऊनही मुलाला नोकरी लावली नाही आणि पैसेही परत न करता विश्वासघात केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लिपारे यांनी पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या चौकशीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
तमनर आखाड्यात साडेतीन लाखांचा ऐवज चोरीस
राहुरी / नगर सह्याद्री –
राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल 3 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
अरुण साहेबराव भिसे यांच्या घरात शुक्रवारी रात्री ही घरफोडी झाली. भिसे कुटुंब गावातील बाळूमामांच्या मेंढ्यांच्या कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटाची उचकापाचक करून लॉकरमधील एक लाख 60 हजार रुपये रोख रक्कम आणि एक लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा एकूण तीन लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे










