पाच लाखांच्या खंडणीची मागणी; बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
तालुक्यातील चिखली येथे शेतजमिनीच्या वादातून एका महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत लता महादेव झेंडे (वय 33, रा. चिखली, ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश भिवसेन झेंडे, मनिषा अंकुश काळे (पूर्ण पत्ता माहीत नाही) तसेच अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 मे रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास चिखली येथील गट क्रमांक 67/1 मधील शेतात आरोपींनी येऊन या शेतात पुन्हा येऊ नका, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी गणेश झेंडे याने नगर-दौंड महामार्गालगत उभे राहून स्वतःकडे कट्टा असल्याचे सांगत, पुन्हा या शेतात आलात तर गोळ्या घालून ठार मारीन, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.आरोपीने मनिषा काळे हिला संबंधित शेतात झोपडी उभारून अतिक्रमण करण्यास सांगितल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. 28 जून रोजी रात्री फिर्यादीच्या घरी जाऊन चिखली घाटातील जमीन विकून टाकण्याचा दबाव आणत, अन्यथा खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून पाच लाख रुपयांचा कोर्ट खर्च देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास गावात राहू देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे करीत आहेत.










