तुकाराम मुंडेंचा दबदबा कायम; अलिशान कारमधून 28 लाखांचा गुटखा जप्त; राज्यात मोठी खळबळ
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
राज्यात प्रतिबंधित गुटखाविरोधातील कारवायांना वेग आला असून, त्याचा परिणाम आता जिल्हा पातळीवरही दिसू लागला आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने अलिशान कारमधून सुरू असलेली गुटखा तस्करी उघडकीस आणत तब्बल 28 लाख 88 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहितीदारामार्फत मुंढेकरवाडी येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा साठवून त्याची विक्री केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यावेळी पांढऱ्या रंगाच्या अलिशान कारमधून काही गोण्या स्विफ्ट कारमध्ये भरताना तीन जण आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अमोल जाधव, अनिल कुरुमकर आणि फरहान बेपारी यांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी 6.03 लाख रुपयांचा आरएमडी, विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू, 22 लाख रुपयांच्या दोन चारचाकी गाड्या (अल्काझार आणि स्विफ्ट), 30 हजार 130 रुपये रोख, तसेच 55 हजार रुपयांचे तीन मोबाईल असा एकूण 28 लाख 88 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
राज्यात गेल्या महिनाभरापासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुटखा माफियांविरोधात सातत्याने कारवाया सुरू आहेत. त्यानंतर आता पोलीस यंत्रणाही अधिक सक्रिय झाल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.
नांदेडमध्ये दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात कर्तव्यात गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. उमरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुनील कोलबुद्धे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल महमद आवेज यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 23 जून रोजी उमरी-धर्माबाद मार्गावर शासकीय दुचाकीवर ड्युटी बजावत असताना दोघांचे वर्तन आक्षेपार्ह असल्याचे समोर आल्यानंतर नांदेडचे पोलीस अधीक्षकांनी तातडीने निलंबनाचे आदेश दिले. या कारवाईद्वारे पोलीस दलातील शिस्तभंग आणि गैरवर्तन अजिबात सहन केले जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.










