अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत तब्बल ५ लाख ९८ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश गुर्जर (वय ३०, व्यवसाय-नोकरी) हे अहिल्यानगर येथील लष्करी मुख्यालयात कार्यरत आहेत. आरोपी विनीत व्ही., नवीन एस. आणि इलयाराजा ए. (सर्व राहणार केरळ) या तिघांनी संगनमत करून फिर्यादी राजेश गुर्जर यांना व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल असे खोटे आश्वासन दिले. त्यांच्या गोड बोलण्याला बळी पडून फिर्यादी यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये ५ लाख ९८ हजार ९९९ रुपये गुंतवले. मात्र, काही दिवस उलटूनही कोणताही नफा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी आरोपींकडे स्वतःचे पैसे परत मागितले. परंतु, आरोपींनी पैसे देण्यास साफ टाळाटाळ केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी सुरुवातीला राजस्थान येथील पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तेथून शून्य क्रमांकाचा प्रथम माहिती अहवाल (झिरो एफआयआर) अहिल्यानगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
फिल्मी स्टाईलने संघटित आरोपींना ठोकल्या बेड्या
अहिल्यानगर : तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या संघटित गुन्हेगारीच्या गंभीर गुन्ह्यातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी शेंडी बायपास परिसरात चित्रपट शैलीत पाठलाग करून ही कारवाई केली. सोमनाथ भानुदास गिते आणि अशोक भानुदास गिते (दोन्ही रा. भगवानबाबा चौक, निर्मलनगर, अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात स्वामीनाथ अनिल सायंबर आणि दिपक प्रभाकर तांदळे हे आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना चकवा देऊन फरार झाले होते. हे दोन्ही आरोपी शेंडी बायपास परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला.आरोपी दुचाकीवरून वेगाने जात असताना, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि त्यांच्या पथकाने पाठलाग करून त्यांना अत्यंत हुशारीने ताब्यात घेतले. १८ जून रोजी रात्री या दोन्ही आरोपींना अधिकृतपणे अटक करण्यात आली.
दरोडा टाकणारे आरोपी २४ तासांत जेरबंद
अहिल्यानगर: शहरातील काटवण रेल्वेस्टेशन रस्त्यावरील गायकेमळा येथे एका तरुणाला लाकडी दांडयाने मारहाण करून लुटणार्या दोन अट्टल आरोपींना कोतवाली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेली काही रोख रक्कमही जप्त केली आहे. विशाल रावसाहेब भोर हा तरुण रस्त्याने जात असताना आरोपींनी त्याला अडवले. त्याला गायकेमळा परिसरात नेऊन लाकडी दांडयाने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या खिशातील पैसे आणि मोबाईलमधील ऑनलाईन खात्यातून जबरदस्तीने पैसे काढून घेत आरोपी पसार झाले होते. या घटनेनंतर विशाल भोर याने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात त्यांच्यासोबत श्रीरामपूर येथील दोघे सामील होते. गुन्ह्यासाठी ओंकार निभवणे याची दुचाकी वापरल्याची कबुली दिली.










