अहमदनगर। नगर सहयाद्री
येथील नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक व दीडशे कोटींच्या घोटाळ्यात बँकेच्या दोन अधिकार्यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली आहे. शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया (रा. नगर) व शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील (रा. नगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर रात्री उशिरा अटक करण्यात आली.
बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार नगर अर्बन बँकेच्या कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले आहे.
त्याचा अहवालही आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर झाला आहे. यात दोषी संचालक, कर्जदार व अधिकार्यांची यादी तयार केली आहे. तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी काही अधिकारी व कर्मचार्यांना बुधवारी चौकशीस बोलावले होते. चौकशीनंतर लुनिया व पाटील यांना अटक करण्यात आली. कर्ज मंजुरी प्रकरणात त्यांच्यावर ठपका असल्याचे उपअधीक्षक खेडकर यांनी सांगितले.