सुपा / नगर सह्याद्री
शासनाला सात महिन्यांचा कालावधी देऊनही आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा अपमान आहे. वारंवार आंदोलने, उपोषण करून सरकारला फरक पडत नसेल तर आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार असल्याचे प्रतिपादन मराठी बांधवांचा शूर योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
सकल मराठा समाजाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेला २० जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून सुरूवात झाली आहे. सोमवार दि. २२ रोजी ऐतिहासिक पारनेर तालुक्यातील सुपा येथील सरदार श्रीमंत शाबुशिंग पवार मैदानावर हे भगवे वादळ धडकताच पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठी बांधवांना संबोधित केले यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सकल मराठा समाजाच्या बांधवांना विनंती आहे की, मी तुमच्या जीवावर मुंबई कडे कुच करत आहे, माझ्या वर विश्वास ठेवा मी गुलाल घेऊनच घरी येईल विश्वास ठेवा. मी मरणाला भीत नाही, आता माघार नाही, सरकारने लय प्रयत्न केले पण मी मॅनेज होणार्यातला नाही. म्हणून त्यांचे फगाणा. आता मात्र मुंबईत भगवे वादळ निर्माण होणार यात शंका नाही. आर्धी लढाई आपण जिंकलो आहे आता फक्त थोडी लढाई बाकी आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, मी असेन किंवा नसेल तुम्ही मात्र एकत्र रहा का देत नाही आपण घेतल्याशिवाय राहणार नाही. असेही जरांगे पाटील म्हणाले.
सुप्यात भगव्या वादळाचे जंगी स्वागत
पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सुमारे १७० एकर क्षेत्रावर मराठी बांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली. पारनेर सकल मराठा समाजाच्या वतीने लापशी व मसाला भात महाभोजनाचे तर श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील मराठी बांधवांच्या वतीने नाष्टा व भोजनासाठी सुमारे ५१ स्टॉल लावण्यात आले.यामध्ये केळी, शाबुदाना खिचडी, लापशी, मसाले भात, भाकरी, चपाती, मिरची,बेसण, दाळी आदींच्या गाड्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यादरम्यान संपूर्ण सुपा शहर भगवे झाले होते.
आठ जेसीबीच्या सहाय्याने पुष्प वृष्टी
ऐतिहासिक पारनेर तालुक्यात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दाखल होताच सुमारे आठ जेसीबीच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्प वृष्टी करण्यात आली.