पुणे। नगर सहयाद्री
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या महामोर्चाचे आज पुण्यात आगमन होणार आहे. पुण्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे.
जालना, बीड, आणि नगरची शिव ओलांडून आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी लाखो मराठ्यांसह आपला महामोर्चा पुण्याच्या दिशेने वळवला आहे.
आज दुपारच्या जेवणाची व्यवस्था भीमा कोरेगाव येथे करण्यात आली आहे. तर, आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे.
महामोर्च्याच्या पाश्ववभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यातून नगरकडे जाणारी वाहतूक आज सकाळी सहा वाजल्यापासून बंद आहे. पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपास वरून वळण घेत मगरपट्टा चौकातून सोलापूर रस्त्याने वळवण्यात आली आहे. मुंबई-पुणे रस्त्यावरील वाहनांना भोसरी, चाकण, शिक्रापूरमार्गे जावे लागणार असून अनेक मुख्य रस्ते आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.