सत्ताधार्यांचे ११ नगरसेवक सहलीवर तर विरोधक वेट अँड वॉचच्या भूमिकेत
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर नगरपंचायतीचे अध्यक्ष नितीन अडसूळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी येत्या १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पारनेर नगरपंचायतीच्या सभागृहात निवड होणार आहे. तर खासदार नीलेश लंके यांचे ११ सत्ताधारी नगरसेवक सहलीवर गेले असून शिवसेना ( शिंदे गट) व भाजप नगरसेवक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. तर नगराध्यक्ष पदाचा १४ महिन्यांचा कालावधी बाकी असून पूर्ण कालावधी या नगराध्यक्षांना ही संधी मिळते की अन्य नगरसेवकांना न्याय मिळतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांनी गेल्या २९ ऑटोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर नगराध्यक्षपद रिक्त झाले. आता नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी श्रीगोंदा पारनेरचे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांची पिठासीन अधिकारी म्हणून व साह्यक अधिकारी सीइओ प्रियंका शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांना ०४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ०२ या नामनिर्देशन पत्र वेळेत सादर करायचे होते. त्याच दिवशी पिठासीन अधिकारी प्राप्त अर्जंची छाननी करणार आहेत. ०५ नोव्हेंबरला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणार आहेत. तर ०६ नोव्हेंबरला निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत असल्याने या नगराध्यक्ष पदाचे संभाव्य नाव पुढे येणार आहेत. त्यानंतर १० नोव्हेंबरला नगरपंचायतच्या सभागृहात पिठासन अधिकारी चिंचकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची सभा सकाळी ११ वाजता आयोजित केली जाणार असून त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी निवड केली जाणार आहे.
डॉ. कावरे, चेडे यांचे अर्ज दाखल
पारनेरच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी कडून नगरसेविका डॉ. विद्या कावरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच महायुतीकडून भाजपचे नगरसेवक अशोक चेडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.



