मुंबई। नगर सहयाद्री-
एप्रिल महिन्यांच्या सुरवातीपासूनच देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ‘अवकाळी’ पावसाने राज्यातील हजेरी लावली आहे. आज पुन्हा हवामान खात्याने पुढिल २४ तासात विजांसह पावसाचा अलर्ट दिला आहे.
आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि अधुनमधून वीज चमकतनाही दिसत आहे. समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. वाऱ्याचा जोरही जास्त असल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील २४ तासात पावसाच्या सरी पाहायला मिळतील.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्याना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
काल ‘अवकाळी’ पावसाची तुफान बॅटीं!
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. तर चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील काही गावांना वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांसह शेती पिकांचं मोठे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले.