जालना / नगर सह्याद्री : आमदार बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. परंतु शिंदे गटाने बंड केल्यानंतर ते त्यांच्यासोबत भाजपसोबत सत्तेत गेले. परंतु तेथे त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. यावर अनेकदा त्यांनी
नाराजीही व्यक्त केलेली आहे.
परंतु आता ते काल रात्रीच अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले असून मनोज जरांगे यांची भेट घेतली. पुढील काही दिवस ते तिथेच तळ ठोकणार आहेत. दरम्यान आज जरांगे पाटलांना समजावण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे.
या शिष्टमंडळामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्यासह निवृत्त न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव असणार आहेत.
यावेळी सरकारकडून मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाजू त्यांना समजवून सांगितली जाणार आहे, तसेच त्यांना उपोषण मागे घेण्यासही सांगितले जाणार आहे. बच्चू कडू हे सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात मध्यस्थी करणार असल्याचे समजते आहे. सरकार आणि आंदोलकांमधील संवाद थांबला आहे.
तसेच ज्या ज्या सत्ताधाऱ्यांनी जरांगे पाटलांना फोन केला त्यांना पाटलांनी ठामपणे नकार दिला होता. परंतू, बच्चू कडूंना तिथे वेगळी वागणूक मिळाली आहे. यामुळे बच्चू कडू या दोघांमधील संवादाचा महत्वाचा दुवा ठरू शकणार आहेत.