अहमदनगर । नगर सहयाद्री
नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक व कर्ज घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांंनी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी नामंजूर केले आहे. दरम्यान अटकेत असलेल्या संगमनेर येथील उद्योजक अमित वल्लभराय पंडित याचा जामीन अर्ज देखील न्यायाधीश सित्रे यांनी नामंजूर केला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडून अर्बन बँक घोटाळ्याचा तपास सुरू आहे. अटकेत असलेल्या कर्जदार व बँकेच्या अधिकार्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज सादर केले आहेत. तसेच, या व्यतिरिक्त काही जणांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले आहेत. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ठपका असलेल्या १०५ जणांची यादी लिक झाल्यानंतर अनेक संशयित पसार झाले आहेत. त्यातील काहींसह ज्यांची या यादीत नावे नाहीत अशांनीही अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार्यांमध्ये देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांचा समावेश होता. त्यावर बँक बचाव समिती व ठेवीदारांच्या वतीने स्वतंत्रपणे बाजू मांडण्यात आली. न्यायाधीश सित्रे यांनी गांधी पती- पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. तर अटकेतील पंडित याचाही जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.