मुंबई । नगर सहयाद्री
राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादीतील गैरसोयींचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सलग दोन दिवस आयोगावर प्रश्न विचारल्यानंतर या मागणीला आयोगाकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मतदार यादीतील घोटाळे उघडकीस येत असून, विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील यादीतील गडबड याबाबत वेगवेगळ्या वेळी मुद्दे उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पुरावे आणि संशयास्पद नावे दाखवून गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एकाच मतदारसंघातील एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावे नोंद झाल्याबाबत चौकशी करायला सांगितले आहे.
दोषी अधिकारी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी चौकशी अहवाल लवकर सादर करतील, जो येत्या आठवड्यात प्राप्त होण्याची शक्यता आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर विरोधकांना त्याची प्रत दिली जाईल. नागपूरमध्ये एकाच पत्त्यावर 200 मतदार असल्याचा आणि दहिसर, चारकोप, आणि इतर ठिकाणी काही व्यक्तींची नावे अनेक ठिकाणी असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
या प्रकरणामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मागणीला मोठा वेग आला आहे. मतदार यादीतील घोटाळे दूर न झाल्यास निवडणुकांचा निर्णय घेऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. त्यांनी निवडणुकांचा पर्याय पुढे ढकलण्याचा प्रस्ताव देखील मांडला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनीही या संदर्भात आवाज उठवला आहे.



