अहमदनगर । नगर सहयाद्री:-
कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी राज्य सरकारच्यावती निकषानूसार पात्र असणार्या नगर जिल्ह्यातील 5 लाख 30 हजार शेतकर्यांपैकी 3 लाख 52 हजार 260 शेतकर्यांच्या खात्यांचे कृषी विभागाकडून ई-केवासी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवार (दि. 30) पासून राज्य सरकारच्यावतीने अनुदान वाटपास सुरूवात करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात पात्र असणार्या शेतकर्याच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. जिल्ह्यात अद्याप 1 लाख 78 हजार 391 शेतकर्यांच्या खात्याची ई-केवायसी बाकी असून येत्या आठ दिवसात ती पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, मागील आठवड्यात कापूस आणि सोयाबीन पिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने काही अटी शिथील केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील 70 हजारांहून अधिक संयुक्त खाते असणारे शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. यामुळे आधीच पाच लाख 30 हजार आणि आता नव्याने 70 हजार संयुक्त खातेदार असे जिल्ह्यात जवळपास सहा लाख शेतकर्यांना कापूस आणि सोयाबनीचे अनुदानासाठी पात्र ठरणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. राज्य सरकारने 2023 च्या खरिप हंगामात कापूस व सोयाबीन पिकांचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रुपये आणि दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती.
त्यानूसार नगरसह राज्यभर कृषी विभागाकडून माहिती संकलीत करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात 5 लाखांहून अधिक शेतकरी सरकारच्या या मदतीसाठी पात्र आहेत. यासह 70 ते 75 हजार सामुहिक खाते असणारे शेतकरी आहेत. त्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेत सामायिक खात्यांमध्ये आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी खातेदारांना दुसर्या खातेदारांची संमती घेऊन स्वयंघोषणापत्र सादर करत येणार आहे. याबाबत स्वयंघोषणापत्र दिल्यानंतर मदत थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. जिल्ह्यात कापूस अनुदानासाठी 2 लाख 17 हजार 778 शेतकरी पात्र असून सोयाबीन अनुदानासाठी 3 लाख 12 हजार 780 शेतकरी पात्र आहेत.