अहमदनगर। नगर सहयाद्री
प्रशासक नियुक्तीनंतरची महापालिकेच्या होणार्या पहिल्याच स्थायी समितीच्या सभेतून शहरातील मोक्याच्या जागा वाटपाच्या विषयाला कात्री देण्यात लावली आहे. मोक्याच्या जागा लाटण्याच्या प्रकाराला प्रशासक म्हणून आयुक्तांनी या निमित्ताने पायबंद घातल्याचे मानले जात आहे.
प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. ८) सकाळी ही सभा होणार आहे. विविध विभागांच्या प्रस्तावांची छाननी करण्यास प्रशासकीय स्तरावर आयुक्तांनी अधिकार्यांची स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. त्यांच्या छाननीनंतर प्रस्ताव प्रशासक तथा आयुक्तांकडे सादर करण्यात येत आहेत. समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त अजित निकत, श्रीनिवास कुरे, सचिन बांगर, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखापरीक्षक आदींचा समावेश आहे.
लोकनियुक्त मंडळ असताना स्थायी समितीची २८ डिसेंबरला सभा होणार होती. या सभेत शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकासह इतर मोक्याच्या ठिकाणच्या जागा भाडेपट्टीने देण्याचे जवळपास सहा विषय होते. लोकनियुक्त मंडळाची मुदत संपणार असल्याने सत्ताधार्यांनी जागा वाटपाचा सपाटा लावला होता. मात्र २७ डिसेंबरला मध्यरात्रीच महापालिकेची मुदत संपुष्टात आल्याने ही सभा रद्द झाली. त्यामुळे या जागा वाचल्या. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची महापालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रशासकास महासभा आणि स्थायी समितीचे अधिकार असतात. त्यामुळे रद्द झालेल्या सभेपुढील विषयपत्रिकेतील कोणते विषय प्रशासक घेणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते.
सोमवारी होणार्या सभेची विषयपत्रिका निश्चित झाली आहे. यात पूर्वीच्या विषयपत्रिकेवरील जागा वाटपाचे विषय वगळण्यात आले आहेत. विषयपत्रिकेत बांधकाम व पाडकाम (सी अँड डी वेस्ट) कचर्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प चालविण्याच्या दरास मंजुरी, घरपट्टी, पाणीपट्टी निर्लेखितचे अर्ज, गाळा हस्तांतर परवानगी, घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (पुणे) या संस्थेस कार्यारंभ आदेश देणे, प्रभाग क्रमांक ८ मध्ये जिजाऊनगर रोहकले घर ते आराध्यानगरी रस्त्याचे कॉक्रिटीकरणाची निविदा, सावेडी व केडगावमधील महापालिकेच्या जागेत संत रोहिदास विकास केंद्र उभारण्याच्या कामाची निविदा, माझी वसुंधरा अभियान निविदा, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत ते अण्णाभाउ साठे वसाहतपर्यंत पावसाळी गटर, रस्ता काँक्रिटीकरण व दिवाबत्तीची सोय करणे, होर्ल्डिंग्ज, फ्लेस, बॅनर्स, पोस्टर्स आदी तात्पुरत्या जाहिरातीसाठी जागा निश्चित करणे, कै. बाळासाहेब देशपांडे रक्तपेढी विभागाकडील रक्तपिशव्यांचे दर निश्चीत करणे, विद्युत, आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचारी नियुक्त करणे, शहरातील उड्डाणपुलाच्या रस्त्यालगत सीना नदी ते सक्कर चौक ते चांदणी चौक आणि एसबीआय चौक ते भिंगारवाला व एसबीआय चौक ते फरहत हॉटेलपर्यंत आरसीसी ओपन गटर कामाची निविदा, कै. बाळासाहेब देशपाडे दवाखाना व इतर नागरी आरोग्य केंद्रामध्ये जेनेरिक औषधी दुकान सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे आदी विषयांचा समावेश आहे.