पारनेर। नगर सहयाद्री
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रिया जाहिर झाली आहे. या सैनिक बँकेच्या १७ संचालक मंडळाच्या जागेसाठी १० जानेवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ११ फेब्रुवारी रोजी या सैनिक सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी मतदान होणार असुन १२ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांनी दिली आहे.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी १७ संचालकां पैकी १२ जागांपैकी सर्व साधारण अनुसूचित जाती जमाती १ जागा, महिला राखीव मतदारसंघ २ जागा, इतर मागास प्रवर्ग १ जागा, भटक्या विमुक्त १ जागा राखीव ठेवण्यात आली असून ५ हजार १६१ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. १६ जानेवारी पर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असुन १७ जानेवारीला छाणणी होणार आहे.
या निवडणुकीतील वैंध अर्जांची यादी १८ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. या निवडणूक रिंगणातुंन उमेदवारांना माघार घेण्याची मुदत १८ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत ठेवण्यात आली असून २ फेब्रुवारी रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. निवडणुकीत विद्यमान चेअरमन शिवाजीराव व्यवहारे बाळासाहेब नरसाळे व कारभारी पोटघन मेजर या तीन पॅनलमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.