कर्जेत। नगर सहयाद्री
एक सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला लोकप्रतिनिधी विकास काम कसे पूर्ण होईल याकडे जास्त लक्ष देतो. समाजापुढे गरिबी दाखवणारे नंतर टक्केवारी मुळे कधी श्रीमंत होतात हे कळत सुद्धा नाही, अशा शब्दात खासदार विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा सांधला.
कर्जत तालुक्यामधील शिवपार्वती लॉन्स येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बचत गटातील महिलांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
विखे म्हणाले, दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून अनेक आश्वासने दिली जातात. पण महिला सक्षमीकरणासाठी कोणतेही काम झाले नव्हते. मात्र यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन अंतर्गत महिलांना ४० कोटी रुपयांचा निधी देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला आहे.
एक सुशिक्षित व्यक्ती निवडून दिल्यानंतर आपल्या भागाचा विकास कसा होतो याचे उदाहरण तुमच्या समोर आहे. एक सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला लोकप्रतिनिधी कामांमध्ये टक्केवारी न घेता काम कसे पूर्ण होईल याकडे जास्त लक्ष देतो मात्र समाजापुढे गरिबी दाखवणारे नंतर टक्केवारी मुळे कधी श्रीमंत होतात हे कळत सुद्धा नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.