अहमदनगर । नगर सहयाद्री-
बारावीचे पेपर देण्यासाठी गेलेली मुलगी घरी परत आली नाही. नातेवाईक, मैत्रिणीकडे शोध घेतला असता ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी सोमवारी (दि. २६) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नगर तालुयातील एका गावात राहतात. त्यांची मुलगी नगर शहरातील एका विद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. सध्या तिचे बारावीचे पेपर सुरू आहे. ती शुक्रवारी (दि. २३) घरून पेपर देण्यासाठी विद्यालयात आली होती. दरम्यान पेपरला दोन दिवस सुट्टी असल्याने मैत्रिणीकडे वसतिगृहात अभ्यास करण्यासाठी थांबले असल्याचे तिने फिर्यादीला सांगितले.
दरम्यान सोमवारी होणार्या पेपरसाठी ती आली नाही. नातेवाईक, मैत्रिणीकडे चौकशी केली असता ती मिळून आली नाही. तिच्याकडील मोबाईल बंद येत असल्याने फिर्यादी यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून मुलीचा शोध सुरू केला आहे.