138 कोटींवर पाणी फेरणाऱ्या राहुल जगतापांच्या पदरी काय? उमेदवारीच्या आदलाबदलीत पटाईत असणाऱ्या दलालांचा वापर चिंताजनक
सारिपाठ । शिवाजी शिर्के–
लोकसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीसाठी अलबेल वातावरण निर्माण झालं. त्याची हवा विशषेत: काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटातील नेत्यांच्या डोक्यात गेली. त्यातूनच सौदेबाजी सुरू झाली. मुख्यमंत्री मीच होणार आणि मीच उमेदवारी देणार असल्याने माझे नाव सुचविणार असणार असाल तर उमेदवारी देतो, असा सौदा नानांनी सुरू केला अन् दुसरीकडे उबाठा गटात उमेदवारी मिळविण्यासाठी खोक्यांच्या जोडीने स्कीन करन्सीचा वापर झाला. शरद पवार यांना याची संपूर्ण माहिती मिळत असूनही त्यांना काहीच बोलता आले नाही. श्रीगोंद्याची जागा कोणतेच मेरीट नसताना संजय राऊतांनी आकंडतांडव करत पदरात पाडून घेतली अन् सेनेसह मविआतील घटक पक्षांशी काडीचाही संबंध नसणाऱ्याला उमेदवारी देऊन (विकून!) टाकली! श्रीगोंद्यातील स्कीन करन्सीचा सौदा बाहेर आल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण जिल्हाभरात उमटले! साजन पाचपुतेच्या माध्यमातून ही सौदेबाजी अनेकांच्या जिव्हारी लागली. 25 खोक्यांमध्ये झालेल्या व्यवहारात पैसे हेच मेरीट पाहिले गेले असले तरी त्याचा परिणाम आता मविआच्या जिल्ह्यातील सर्वच जागांवर होणार हे नक्की!
खस्ता खात पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानंतरही सणसणीत चपराक कशी बसते आणि त्यातून तोंड कसे झोडावे लागते याचे उत्तम उदाहरण म्हणजे माजी आमदार राहुल जगताप हे झालेत! लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान माजी आमदार राहुल जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बोलावणे झाले. अजित पवारांच्या निवासस्थानी जगताप-पवार यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीला जिल्ह्यातील पवार गटाचे एक आमदार देखील उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार सुजय विखे यांना मदत करण्याबाबतची भूमिका राहुल जगताप यांनी घ्यावी अशी विनंती वजा भूमिका अजित पवार यांनी मांडली. त्याबदल्यात कुकडी कारखान्याला राज्य शासनाकडून 138 कोटी रुपयांची मदत करण्याची आणि तसे आदेश लागलीच काढण्याबाबतही अजित पवार यांनी आश्वासीत केले. रक्कम 138 लाख नव्हे तर 138 कोटींची होती.
राहुल जगताप यांनी त्याक्षणाला कारखान्याचे हित पाहून अजित पवार यांच्या भूमिकेला होकार देणे अपेक्षीत होते. त्यातून कारखान्यासमोरील अडचणी सुटल्या असत्या आणि स्वत:च्या पदरात आणखी काही बरेच पडले असते. मात्र, स्वाभिमानी जीवन जगलेल्या कुंडलिकराव जगताप यांच्या संस्कारांची शिदोरी पदरी असणाऱ्या राहुल जगताप यांनी अजित पवार यांची ही 138 कोटी रुपयांची ऑफर नम्रपणे नाकारली! दादांची माफी मागत त्यांनी आपण शरद पवार साहेबांसोबत राहणार असल्याची स्पष्ट भूमिका मांडली. यानंतर मुंबईतून बाहेर पडलेल्या राहुल जगताप यांनी तडक श्रीगोंदा गाठले आणि नीलेश लंके यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले. श्रीगोंद्यातून लंके यांना मोठे मताधिक्य देण्यात ज्यांनी- ज्यांनी भूमिका बजावल्या त्यात राहुल जगताप यांची भूमिका ही निर्णायक राहिली.
विधानसभेचे वारे वाहू लागल्यानंतर श्रीगोंद्यातून राहुल जगताप हाच आमचा उमेदवार असणार असल्याचे सांगताना त्याच्या निष्ठेचे कौतुक थेट शरद पवार, जयंत पाटील यांनी केले. साखर कारखान्याकडून उस उत्पादकांना देय असणाऱ्या रकमेबाबत डांगोरा पिटवला जात असला तरी ही रक्कम किती आणि ज्यांना ही रक्कम द्यायची ते उत्पादक श्रीगोंदा- नगर तालुक्यातील अवघे दोनशे! बाकीचे ऊस पुरवठा करणाऱ्या अन्य तालुक्यातील! मात्र, असे असताना या शेतकऱ्यांना त्यांची देणी देण्याची व्यवस्था राहुल जगताप यांनी केली. शरद पवार हे स्वत: आपल्या पाठीशी असल्याने राहुल जगताप यांनी संयमी भूमिका घेत रणनिती तयार केली.
महाविकास आघाडीकडून राहुल जगताप यांचे नाव अंतिम होतेय असे लक्षात आल्यानंतर राजेंद्र नागवडे यांनी नेहमीप्रमाणे प्यादे टाकण्यास प्रारंभ केला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन असणाऱ्या बाबासाहेब भोस यांना त्यांनी आधी गळाला लावले. साजन पाचपुते याला काष्टीचा सरपंच करण्यात राजेंद्र नागवडे यांचीच भूमिका होती. साजन पाचपुते याला राजेद्र नागवडे यांनी प्यादा म्हणून वापरले. त्याचा वापर करत थेट मातोश्रीची एंट्री मिळवली! संजय राऊतांची ‘व्यवस्था’ आधीच साजनकडून झाली होती. आदलाबदलीत पटाईत असणाऱ्या दलालांचा वापर त्या झाला आणि लागलीच दुसऱ्या क्षणाला नागवडेंच्या हाती एबी फॉर्म! एखाद्या प्रख्यात जादुगाराला लाजवेल असे सारे घडले! सांगलीत जे घडले अगदी तसेच श्रीगोंद्यात घडले. सादेबाजीत आपल्याला उमेदवारी मिळाली नसल्याची खात्री पटताच स्वाभिमानी राहुल जगताप यांनी बंडाचे निशान फडकवले.
जोडीला काँग्रेसच्या घनश्याम शेलार यांनीही तेच केले. लोकसभेच्या वेळी 138 कोटी घेतले असते तर लोकसभेचे निकाल वेगळा लागला असता. मात्र, स्वाभिमानी बाणा जपणाऱ्या राहुुल जगताप यांनी तसे केले नाही. प्रामाणिक राहूनही उमेदवारी टाळली आणि ज्यांनी विरोधात काम केले त्यांना उमेदवारी दिली गेली. यातून राहुल जगताप समर्थकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आणि त्याची किंमत नागवडेंना मोजावी लागणार हे नक्की! साजन पाचपुते यांनी हा खेळ उभा केला असला तरी त्यांना गमवायचे काही नाही, कारण त्यांच्याकडे गमवण्यासारखे काहीच नाही! काष्टीचे सरपंचपद असले तरी त्यांच्याविरोधात आताच मोठा असंतोष आहे. कोणत्याही क्षणी त्यांची ‘खाट’ पडू शकते. स्कीन करन्सी अन् खोक्याचा वापर करत उमेदवारी मिळविणाऱ्यांना आणि उमेदवारी मिळवून देणाऱ्यांना मतदारसंघात प्रचारासाठी फिरताना जाब विचारला जाणार हे नक्की!
प्राजक्त तनपुरे अन् रोहित पवार यांच्या तोंडातील सोन्याचा चमचाच त्यांना अडचणीत आणणार!
थोरल्या पवारांचा नातू फक्त एवढीच ओळख असणाऱ्या परंतू विविध प्रलोभने दाखवत कर्जत-जामखेडकरांनी संधी दिलेल्या रोहीत पवार अन् तनपुरेंच्या राजघराण्यातील वाड्याचा राजकीय वारसदार एवढीच ओळख असणाऱ्या प्राजक्त तनपुरे या दोघांना त्या-त्या मतदारसंघातील जनतेने स्वीकारले. राहुरीतील विजयासाठी प्राजक्त तनपुरे याने कर्डिले यांच्याकडून दुखावल्या गेलेल्यांची मोट बांधली आणि तिकडे रोहीत पवार यानेही तेच केले. राम शिंदे यांच्या विरोधात एकास एक लढत केली तर आणि तरच आपण जिंकू शकतो हे हेरल्यनंतर रोहीत पवार यांच्या यंत्रणेने ‘भाव’ं फोडला. त्यातून अनेकांना गळाला लावले. राम शिंदे हे मंत्री होते. त्यातून त्यांचा संपर्क कमी झाला होता. त्यांच्या विरोधात नरेटीव्ह सेट केले गेले. तिकडे राहुरीत कर्डिलेंच्या विरोधातही तेच केले गेले. आता यावेळी या दोघांच्याही विरोधात मतदारसंघात प्रचंड विरोधी वातावरण तयार झाले आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन राजकारणात आलेल्या या दोघांनाही पहिल्यांदाच आमदारकीच लॉटरी लागली. पाच वर्षात दोघांकडून जनतेचा भ्रमनिरास झाला. आता या दोघांच्याहीसाठी अस्तित्वाची लढाई खेळण्यची वेळ आली आहे.