गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी
अहमदनगर | नगर सह्याद्री
सोमवारी रात्री जेऊर येथील महावितरण कंपनीच्या चौकात कत्तलसाठी चाललेल्या गायींचा आयशर टेम्पो गोरक्षकांनी पकडला. तसेच गायींची सुटका करत पांजरपोळ येथ सोडण्यात आल्या. संबंधितांनी गोरक्षक दिपक शिंदे यांच्यावर खुनी हल्ला केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे या मागणीसाठी जेऊर ग्रामस्थांनी व गणेश मंडळांनी गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीत एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर गणपती विसर्जन करण्याचा निर्णय जेऊर ग्रामस्थ व गणेश मंडळांनी घेतला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु होती. मंगळवारी राज्यातसह अहमदनगर जिल्ह्यात लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. परंतु, नगर तालुक्यातील जेऊर येथे ग्रामस्थांनी व गणेश मंडळांनी गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी रात्री कत्तलसाठी चाललेल्या १८ गायींची सुटका गोरक्षकांनी केली होती. याचा राग येऊन संबंधित अज्ञातांनी गोरक्षक दिपक शिंदे याच्यावर खुनी हल्ला केला. या प्रकरणी संंबंधित अज्ञातांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी जेऊर ग्रामस्थांनी व गणेश मंडळांनी गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी ग्रामीण डीवायएसपी संपतराव भोसले, एमआयडीसी पोलिस ठोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी जेऊरमध्ये येत ग्रामस्थांशी चर्चा केली परंतु, ग्रामस्थ आरोपी अटक होईपर्यंत गणेश विसर्जन न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. बुधवारी सकाळी एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी जेऊर येथील मारुती मंदिर येथे गणेश मंडळ व ग्रामस्थांची बैठक घेत तातडीने संबंधित आरोपींना अटक करण्यात येईल तसेच गोवंशीय जनावरांची हत्या करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. संबंधित गुन्ह्यातील एक आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी व गणेश मंडळांनी एकत्रित मिरवणूक काढून गणेश विसर्जन करण्याचे ठरवले.