मुंबई / नगर सह्याद्री : मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याने राज्यात खळबळ उडाली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला असल्याचे सर्वश्रुत आहे.
मॉरिस नोरोन्हा याने केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गोळीबारानंतर मॉरिस नोरोन्हा याने स्वतःलाही संपवले. मॉरिस नोरोन्हा याच्यावर याआधीही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. हत्या, अत्याचार आणि फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. मॉरिस नोरोन्हा याच्यावर 80 लाख रुपयांची फसवणूक, महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा,धमकी देण्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.
कोण आहे मॉरिस भाई ?
मॉरिस नोरोन्हा स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता समजायचा, परिसरातील लोक त्याला मॉरिस भाई या नावाने ओळखत होते. बोरिवलीतील आयसी कॉलनी परिसरात समाजसेवक कार्यकर्ता म्हणून मॉरिसची ओळख होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि मॉरिसमध्ये वाद सुरू होता. हा वाद संपवण्यासाठी दोघांनी फेसबुक लाईव्ह केले. अनेक नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मॉरिस नोरोन्हा स्वत:ला वर्णन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ता म्हणतो. कोविडच्या काळात त्याला काही पुरस्कारही मिळाले आहेत अशी माहिती मिळाली आहे.