अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नागरिकांना पाणीपट्टी भरमसाठ आकारण्यात आली आहे. मग त्यांना सुरळीत पाणीपुरवठा केला पाहिजे. परंतु असे होताना दिसत नाही. गेल्या अनेक दिवसापासून शहरात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकंती करावी लागत आहेत. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होतात. नळाला पाणी आले, तर ते कमी दाबाने येत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उन्हाळ्यात नागरिकांचे असे हाल करणे दुर्दैवी आहे.
मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. लवकरात लवकर पाणी प्रश्नावर तोडगा काढून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, अन्यथा नागरिकांसह शहरात जल आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. शहरातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिले व चर्चा केली.गेल्या पंधरा वीस दिवसांपासून महानगरपालिकेचा पाणी पुरवठा व्यवस्थापन संपुर्ण शहरात विस्कळीत झाले आहे.
शहराचे उपनगर असलेले केडगाव, सावेडी, बोल्हेगाव, नागापुर, सावित्रीबाई फुलेनगर, विनायकनगर, फुलसौदंर मळा, बुरुडगाव रोड, तसेच नगर शहरामधील मध्य वस्तीत पाणीपुरवठा होत नाही. ऐन ऊन्हाळयाच्या दिवसात सर्व नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गरज असतानाच पालिकेकडून त्यांना पाणि उपलब्ध होत नाही. कर्मचा-यांचे फोन बंद असतात. विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळतात. तरी आपण स्वतः लक्ष घालुन पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरीकासंह जन आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.