अयोध्या / नगर सहयाद्री : काल 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालेल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील अनेक मान्यवर, उद्योगपती, राजकारणी, बॉलिवूडमधील कलाकारांसह हजारो नागरिक त्या ठिकाणी आलेले होते. परंतु याच सोहळ्यात एक घटना घडली की ज्याने सर्वांनाच काही काल गोंधळून सोडले.
या सोहळ्यादरम्यान मंदिराच्या परिसरात हार्ट ॲटॅक आल्याने एक व्यक्ती अचानक खाली कोसळली. मात्र भारतीय वायु सेनेच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमने तेथे धाव घेतली. मेडिकल इमर्जन्सीसाठी तैनात करण्यात आलेल्या मोबाईल हॉस्पिटलमध्ये त्यास दाखल करून तातडीने त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्या इसमाला हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट ॲटॅक आला होता.
मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने त्याला जीवनदान मिळाले. 65 वर्षीय रामकृष्ण श्रीवास्तव अभिषेक असे त्यांचे नाव आहे. रामकृष्ण श्रीवास्तव पडल्यानंतर अवघ्या एका मिनिटात त्यांना जवळच असलेल्या मोबाईल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रिपोर्टनुसार, रामकृष्ण श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांची प्रकृती बरीच बिघडली होती. प्राथमिक तपासणीत त्यांचा रक्तदाबही खूप वाढला होता.
त्यानंतर रामकृष्ण श्रीवास्तव यांच्यावर त्या (मोबाईल) रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर होण्याची वाट डॉक्टरांनी पाहिली. एकदा ते स्थिर झाल्यावर रामकृष्ण श्रीवास्तव यांना पुढील वैद्यकीय निरीक्षण आणि विशेष काळजी घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.