अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
दुचाकी चोरी करणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन बुलेटसह एकूण ६ लाख ४० हजारांच्या ०५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सचिन देविदास दाने, ( वय 25, हल्ली रा.नांदुर्खी रोड, शिर्डी ), प्रसाद राजेंद्र रोटे ( वय 19, रा.जानेफळ, ता.वैजापूर ) गणेश भागीनाथ जगदाळे, ( वय 28, रा.जाणेफळ, ता.वैजापूर ) यांच्यासह एक विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे.
नगर शहरासह जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, सोमनाथ झांबरे, प्रमोद जाधव, भगवान थोरात, सुनिल मालणकर, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे व महादेव भांड यांचे पथक काम करत होते.
पथक दुचाकी चोरी करणार्या संशयित आरोपींची माहिती काढत असताना सोमवार (दि १४) रोजी पोलीस निरीक्षक आहेर यांना माहिती मिळाली की, आरोपी सचिन देविदास दाने साथीदारासह चोरीच्या मोटार सायकल विक्रीसाठी अहिल्यानगर येथून मिरजगाव, ता.कर्जत येथे येणार आहे. निरीक्षक आहेर यांनी सदरची माहिती पथकास कळवून कारवाई करण्याबात सूचना दिल्या.
पथकाने तात्काळ मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून चार संंशयितांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिकी विचारपूस केली असता आरोपी सचिन देविदास दाने याने विधीसंघर्षित बालक व सुरज गायकवाड अशांनी मिरजगाव, राहाता, पुणे, येवला व शिर्डी येथून मोटार सायकल चोरी करून त्या विक्रीसाठी प्रसाद राजेंद्र पोटे व गणेश भागीनाथ जगदाळे यांना दिल्याची कबुली दिली. त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याची त्यांनी कबुली दिली. अटकेतील चार आरोपींना पुढील तपासकामी मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.