मुंबई । नगर सहयाद्री
रखरखत्या उन्हाने महाराष्ट्र पोळून निघाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच आता पुन्हा राज्यात अवकाळी पाऊस होणार आहे. राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याच्या इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पूर्व विदर्भात काल अवकाळी पावसासह जोरदार गारपीटने अनेक भागात हजेरी लावली. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने होरपळणार्या विदर्भातील तापमानात घट झाली. मात्र हा अवकाळी पाऊस शेतातील पिकांसाठी नुकसानदायक ठरला आहे. काही ठिकाणी फळबागांचे नुकसानही झाले आहे.
आता पुन्हा विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली असून विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाट वादळी वार्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.