नगर सहयाद्री टीम-
राज्यात अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. एकीकडे उकाड्यामुळे जनता हैराण झाली आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटामध्ये सापडला असून बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.
जिल्ह्यात पावसाची दमदार सलामी?
तीव्र उन्हाळ्यामुळे अंगाच्या लाहीलाही होत असताना काल वरुणराजाने जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात दमदार एंट्री केल्याने शेतमाल वाचवण्यासाठी बळीराजाची तारांबळ उडाली होती. सोमवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. दुपारी तीन ते चार वाजेनंतर आकाशात ढग जमा होऊ लागले होते. अखेर सांयकाळी पाचनंतर अचानक पावसास सुरवात झाली. सुसाट वाऱ्यासह तासभर आवकाळी पाऊस सुरू होता. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटामध्ये सापडला. आवकाळी पावसाबरोबर वादळी वारा असल्याने अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान आंबा पिकाचे झाले आहे. वादळी वारा व अवकाळी पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात कैऱ्या पडल्या. तसेच मेथी, कोंथिंबीर व इतर पालेभाज्या व फळ पिकानांही या आवकाळीचा फटका बसला आहे. तसेच शेतात काढून टाकलेली रब्बी ज्वारी, हरभरा व गव्हाच्या पिकांचे या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
यंदा उत्तम पावसाचा अंदाज
जगभरातील स्थिती मोसमी पावसाला पोषक आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात र्नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त, १०६ टक्के पडण्याचा अंदाज आहे. प्रशांत महासागरात सध्या एल-निनो सक्रिय असून, तो मध्यम अवस्थेत आहे. जूनच्या सुरुवातीपर्यंत एल-निनो निष्क्रिय स्थितीत जाईल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ला-निना सक्रिय होईल. हिंद महासागर द्विध्रुविता (इंडियन ओशन डायपोल, आयओडी) सध्या निष्क्रिय आहे, तो जूनच्या सुरुवातीस सक्रिय होईल. युरोशियातील (युरोप आणि आशिया) बर्फाच्छादित क्षेत्र मार्च-एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा कमी राहिले, ही सर्व स्थिती र्नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
– डॉ. मृत्युंजय महापात्रा ( महासंचालक, हवामान विभाग )
हवामान बिघडलं; काळजी घ्या
नगर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर वातावरणात बदल पहावास मिळाले. ढगाळ वातावरणामुळे पारा ३८ अंशावर असला तरी ढगातील उन्हाचा चटका जबर होता. यासह वातावरणातील दमटपणा वाढला होता. वाढलेल्या उन्हामुळे ग्रामीण भागात सकाळी दहानंतर सांयकाळी पाचपर्यंत शुकशुकाट दिसत आहे. वातावरणातील कोरडेपणा आणि वाढती उष्णता यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी पिण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. याशिवाय सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बाहेर पडण्याची गरज भासल्यास योग्य ती काळजी घ्या. डोके झाकून घ्या, डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल वापरा, असं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता
पुढील २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊसहोणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने मंगळवार आणि बुधवारी मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात सोमवारी विक्रमी तापमान नोंदवले गेले आहे. मंगळवारी (ता. १६) उत्तर कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.