मुंबई / नगर सह्याद्री : शिवसेना ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने कोविड-19 जंबो सेंटर्स घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात पाटकर आणि त्यांच्या भागीदारांची १२ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
म्युच्युअल फंड युनिटस, बँकेची खाती आणि ३ फ्लॅट्स अशी एकूण १२.२ कोटींची संपत्ती ईडी ताब्यात घेणार असून तीन फ्लॅट्सपैकी २.८ कोटींचा एक फ्लॅट हा सुजीत पाटकरांच्या नावावर असल्याचीही माहिती मिळाली आहे. पाटकर यांना या प्रकरणी ईडीने या वर्षी जुलैमध्ये अटक केली होती. त्यांनी लाइफलाइन मॅनेजमेंट सर्व्हिसेससाठी निविदा मिळवून ३१.८४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
मालमत्ता कोविड घोटाळ्यात कमावल्याचा ईडीचा आरोप
या घोटाळ्यातील सहआरोपींमध्ये राजीव साळुंखे आणि एका महिलेचा समावेश आहे. तसेच डॉ. हेमंत गुप्ता यांचा २ कोटी ७० लाखांचा म्युच्युअल फंड जप्त करण्यात आला आहे. सहआरोपींच्या खात्यात असलेले ३ कोटी आणि काही बँक खात्यांमध्ये ठेवलेले ३३ लाख रुपयेसुद्धा ईडीने जप्त केले आहेत. ही सर्व मालमत्ता कोविड घोटाळ्यात कमावल्याचा आरोप ईडीने केला आहे.