शरद झावरे /नगर सह्याद्री : अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी आली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर लोकसभा लढवण्यासाठी आ. निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा आज(दि.२९) दिला आहे. पारनेर मध्ये झालेल्या सवांद मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. ही घोषणा करताना आ.निलेश लंके हे भावुक झाले होते.
नगर दक्षिण अर्थात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी हा राजीनामा देत व त्यांच्या आग्रहाखातर तसेच
कार्यकर्त्यांवर झालेल्या वारामुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर सविस्तर भूमिका मांडली. निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडताना निलेश लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. ते भावूक झाले. दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण जायला हवं. त्यामुळे मी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवणार आहे, असं निलेश लंके म्हणाले. यावेळी निलेश लंके यांनी राजीनामा वाचून दाखवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊ, असं निलेश लंके यांनी जाहीर केलं.
“आता शिवधनुष्य हाती घेतलं आहे. मी अजित पवारांची माफी मागतो. आता मला माफ करा. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. आता आपल्याला कायदेशीर अडकायचं नाही. आता आपण अभिमन्यू आहोत. आपण चक्रवादळात अडकलो आहोत. तुम्ही मला पाच वर्षांसाठी निवडून दिलं. मात्र आता साडेचार वर्षे झाली आहेत. मला पाच वर्षांसाठी निवडून दिलं आहे. मात्र मी तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आता आपल्याला ठोस निर्णय घ्यावा लागेल. चार महिने कमी असताना आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मी म्हणालो माझ्या लोकांना विचारू द्या”, असं निलेश लंके कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
खरेतर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या चर्चा सुरू होत्या. स्वतः निलेश लंके यांनी देखील मध्यंतरी ते शरद पवार यांच्या गटात सामील होतील असे संकेत दिले होते. मोठ्या साहेबांनी अर्थात शरद पवार यांनी देखील निलेश लंके यांचे पुण्यात आपल्या पक्ष कार्यालयात स्वागत केले होते.
त्यावेळी निलेश लंके यांनी साहेब जो आदेश देतील तो मान्य असेल असे म्हटले होते. यानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंके हे अहमदनगर मधील लोकप्रिय नेते आहेत. ते आमचे उमेदवार व्हावेत, त्यांनी अहमदनगर मधून लोकसभा निवडणूक लढवावी असे म्हटले होते.
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अहमदनगर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील निलेश लंके यांची अहमदनगर दक्षिण मधून जोरदार एन्ट्री होईल आणि यंदाची निवडणूक देखणी होईल असे स्पष्ट म्हटले होते. बाळासाहेब थोरात यांच्या या विधानामुळे निलेश लंके हे महाविकास आघाडीचे 2024 लोकसभा निवडणुकीचे नगर दक्षिण मधील उमेदवार राहतील हे जवळपास स्पष्ट झाले होते.
दरम्यान आज यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज औपचारिक रित्या निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. यावेळी निलेश लंके यांनी मी देव पाहिला नाही मात्र देवासारखा श्रेष्ठ माणूस म्हणजे शरद पवार साहेब, साहेबांनी सांगितलं लोकसभा लढवावी लागेल, मी म्हणालो ठीक आहे, असे म्हटले आहे.
अर्थातच भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार तथा यंदाच्या निवडणुकीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात लोकसभेची लढत होणार आहे. निवडणूक ही सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी असली तरी देखील प्रत्यक्षात शरद पवार विरुद्ध विखे अशी ही रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का
नीलेश लंके हे पारनेरचे आमदार असून ते अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जातात. पण त्यांनी खासदारकी लढवण्याची घोषणा केली तेव्हापासून अजित पवार लंकेंवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आता आज लंके यांनी राजीनामा दिल्यामुळे ते तुतारी हाती घेतील. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का असल्याचे मानले जात आहे.