नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
Breaking! अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी हजर राहणार की नाही याबद्दल त्यांनी मोठी घोषणा केली आहे. अयोध्येत होणारा 22 तारखेचा कार्यक्रम हा मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राजकीय कार्यक्रम केला असल्याने आपण त्या ठिकाणी जाणार नसल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला जाणार ज्याला जायचं आहे त्याने जावं असंही ते म्हणाले. या आधी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही अयोध्येच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात झाली आहे. ही यात्रा नागालँडमधील कोहिमा या ठिकाणी पोहोचली आहे. त्यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हिंदू धर्मातील महत्त्वाच्या लोकांनीही राम मंदिराच्या उद्घाटनाशी संबंधित कार्यक्रमाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. हा कार्यक्रम धार्मिक राहिला नसून निवडणुकीशी संबंधित झाला आहे. अशा स्थितीत काँग्रेस अध्यक्षांनी न जाण्याचा र्णय घेतला आहे. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. मात्र आमच्या पक्ष आणि आघाडीतील ज्यांना जायचे आहे ते तिथे जाऊ शकतात.
काँग्रेसची न्याय यात्रा अयोध्येच्या मार्गात नाही. त्यामुळे आपण या यात्रेवरच भर देणार असून अयोध्येला जाणार नसल्याचं राहुल गांधी म्हणाले.
भाजपचा मुकाबला करण्यासाठी ‘इंडिया’ तयार
भाजपचा मुकाबला करण्यासाठी इंडिया आघाडी पूर्णपणे तयार असल्याचा दावाही राहुल गांधींनी केला. भारत जोडो न्याय यात्रा ही विचारधारेची यात्रा आहे. इंडिया आघाडी निवडणुका चांगल्या प्रकारे लढवेल आणि जिंकेल. न्याय यात्रा ही सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायासाठी असून त्यात जात जनगणनेसारखे अनेक मुद्दे आहेत. पश्चिम बंगालमधील इंडियाच्या युतीच्या प्रश्नावर ते पुढे म्हणाले की, “आम्ही बंगालमधील आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करत आहोत. सध्या जागावाटपावर चर्चा सुरू असून त्यात कोणतीही गुंतागुंत नाही. मात्र काही राज्यांमध्ये जागावाटपासंदर्भात समस्या असल्याचे त्यांनी मान्य केले. भाजपचे मॉडेल हे द्वेषपूर्ण मॉडेल असल्याचं सांगत राहुल गांधी म्हणाले, भारत सरकार इतर मागासवर्गीय (ओबीसी), दलित आणि आदिवासींद्वारे चालवले जात नाही. त्यांच्यावरील अन्यायामुळे द्वेष वाढत आहे. आम्हाला विश्वास आहे की आमच्या ज्या काही छोट्या समस्या असतील त्या सोडवल्या जातील आणि आम्ही भाजपच्या विरोधात निवडणूक लढवू.”