spot_img
अहमदनगरAhmednagar: महापालिकेच्या मोक्यांच्या जागांवर राजकीय नंगानाच! सावेडीसह उपनगरात अधिकृत ताबेगिरी

Ahmednagar: महापालिकेच्या मोक्यांच्या जागांवर राजकीय नंगानाच! सावेडीसह उपनगरात अधिकृत ताबेगिरी

spot_img

सुहास देशपांडे | नगर सह्याद्री-
खासगी जागांवर दादागीरी करून ताबा मिळविण्याचे लोण नगरमध्ये असतानाच आता सत्तेचा वापर करून सरकारी जागांवर ‘अधिकृत’ ताबागिरी सुरू झाली आहे. मोक्याच्या जागा ताब्यात घेऊन गलेलठ्ठ भाडे कमावून खिसे भरण्याचे प्रयत्न आहेत. मोक्यांच्या जागांवरील या राजकीय नंगानाचाला दुर्दैवाने प्रशासनाचीही साथ मिळत आहे.

शहरात महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणी अनेक जागा आहेत. या जागांवर अनेकांचा डोळाही आहे. महापालिकेच्या स्थायी समिती आणि महासभेच्या गेल्या काही महिन्यांतील विषयपत्रिका पाहिल्यास बहुतांश विषय जागा भाडेपट्टीने देण्याचे आहेत. या विषयांना विनातक्रार मंजुरी मिळत आहे. एकमेकांची जिरवाजिरवीचे चित्र निर्माण करणारे सत्ताधारी आणि विरोधक या विषयावर मात्र दिलजमाई दाखवीत असल्याचे वारंवार पुढे आले आहे. सावेडी, केडगाव, बुरूडगाव रस्ता आदी उपनगरातील या जागा ‘भाडेपट्टी’ असा गोंडस शब्द वापरून अक्षरशः लुटल्या जात आहेत.

सावेडीत जागांचा दर सर्वाधिक आहे. सावेडीतील जागा प्रत्येकालाच मोहात पाडतात. त्यातही मोक्याच्या ठिकाणी जागा असेल तर ती मिळविण्यासाठी ‘साम, दाम, दंड’ निती वापरली जाते. सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकालगत असलेल्या सावेडी क्रीडा संकुलातील जागांची अशाच पद्धतीने खैरात सुरू आहे. क्रीडा संकुलाच्या जागेत नाट्यगृह उभारण्याचा निर्णय झाला. गेल्या अनेक वर्षांपासून या नाट्यगृहाचे बांधकाम चालूच आहे.

ते कधी पूर्ण होईल, याची कोणालाही शाश्वती नाही. प्रत्येक महापौर, आयुक्त नाट्यगृह लवकरच पूर्ण करू, अशी आश्वासने देत आहे. मात्र ते वर्षानुवर्षे अर्धवट अवस्थेतच आहे. याच सावेडी क्रीडा संकुलात पूर्वी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र होते. या केंद्रासाठी जिल्हा नियोजन समितीतून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत निधी घेऊन ते सावेडीतील प्रभाग कार्यालयासमोर उभारण्यात आले. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र असे त्याचे नामकरणही करण्यात आले. मात्र जेंव्हापासून ही इमारत उभारली, तेंव्हापासून प्रशिक्षण केंद्र बंद पडले आहे. आता या जागेवर अनेकांचा डोळा आहे.

जुने प्रशिक्षण केंद्राची इमारत भूईसपाट करण्यात आली. त्यामुळे रिकामी झालेली जागा मिळविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जागांचे संरक्षण व्हावे म्हणून महापालिकेने मध्यंतरी तेथे वॉचमनची नियुक्ती केली होती. आता वॉचमन तर नाहीच, पण त्याच्यासाठी उभारण्यात आलेली केबीनही जमीनदोस्त करण्यात आली आहे. येथील जागा भाडेपट्टीने देण्याचा सपाटा महापालिकेने लावला आहे. स्थायी समिती आणि महासभेत हे विषय मंजूर करण्यात येत आहेत.

जागा इतरांच्या नावाने घेतली जात असली तरी तेथील उत्पन्नाची मालकी राजकीय व्यक्तीकडे असेल. त्यांच्याच प्रयत्नातून जागेची लॉटरी लागलेली असते. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या एका प्रमुख पदाधिकार्‍याने तेथे नुकतीच जागा पटकावली आहे. त्याला जागा दिल्याने इतरांनीही आपला हक्क सांगितला असून, त्यांच्यासाठीही विषयपत्रिकेत जागेचे विषय आणले गेले आहेत. महापालिकेचे भाड्याचे दर प्रतिमहिना दोन-तीन हजार असतील, पण या जागेवर गाळा उभारून ती इतरांना भाड्याने देऊन दरमहा २५ ते ३० हजार रूपये भाडे कमविण्याची सोय या निमित्ताने महापालिका करून देत आहे.

महापालिका लोकनियुक्त मंडळाची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे या अखेरच्या महिन्यात सभांचा धडाका सुरू आहे. या महिन्यातील दुसरी महासभा २९ डिसेंबरला होत आहे. स्थायी समितीच्याही सभांचा धडाका सुरू आहे. दोन्ही सभांच्या विषयपत्रिकेत जागा भाडेपट्टीने देण्याचे विषय घेण्यात आले आहेत. जाता जाता जेवढ्या मोक्याच्या जागांवर ताबागिरी करता येईल, तेवढी केली जात आहे. विशेष म्हणजे प्रशासनही या खैरातीला डोळे झाकून मान्यता देत आहे. विषयाची टिपणी सादर करताना ती सोयीची केली जात आहे. ‘भाड्याच्या माध्यमातून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न’ असे निर्लज्जपणे याचे समर्थनही केले जात आहे. कोणीच विरोध करत नसल्याने मोक्यांच्या जागांवर हा राजकीय नंगानाच सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कर्जदार शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे ‘हे’ महत्वाचे आवाहन !

अहमदनगर / नगर सहयाद्री : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे...

Ahmednagar News : चिंग्या साथीदारासह जेरबंद, जामखेडमध्ये मुकादमावर केला होता गोळीबार

अहमदनगर / नगर सहयाद्री : जामखेड गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने...

आमदार जगताप यांचे नगरकरांना गिफ्ट! ‘या’ रस्त्यासाठी १५० कोटी मंजूर

अहमदनगर। नगर सहयाद्री- नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या ३०८ कोटी रुपयांच्या प्रस्तावातील कामांना...

‘मार्केटींग फेडरेशन अजित पवार गटाकडे’

श्रीगोंदा | नगर सह्याद्री राज्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशन या संस्थेच्या...