बारामती / नगर सह्याद्री : कंपन्यांमधील विषारी वायूमुळे होणाऱ्या अपघातांच्या घटना काही नवीन नाहीत. आता एक मोठी बातमी आली आहे. अहमदनगर जवळील दौंड तालुक्यात ही घटना घडली आहे. येथील एका कंपनीत रासायनिक विषारी वायूमुळे एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन कामगारांची प्रकृती अत्यावस्थ आहे.
असल्याची घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव येथे ही घटना घडली असून जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील भांडगाव येथील एका कंपनीत गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रासायनिक ऍसिडचे ड्रम पडून आग लागल्याची घटना घडली. ही आग विझवण्यासाठी अग्निबंबाचा वापर केल्याने परिसरात विषारी वायू तयार झाला. या विषारी वायुच्या संपर्कात आल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीत ऍसिड ड्रम अचानक पलटी झाल्याने कंपनीत अचानक आग लागली. ही आग विझविण्यासाठी कामगारांनी तातडीने अग्निबंबाचा वापर केला. ही आग विझवताना मोठ्या प्रमाणात विषारी धूर तयार झाला होता. हा धूर कामगारांच्या नाका तोंडात गेला होता.
घटनेदरम्यान, कामगारांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. मात्र संध्याकाळी कामगार घरी गेल्यानंतर 3 कामगारांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. यामधील एकाचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहेत. अमोल चौधरी असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर दोन कामगार अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.