अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
विधानसभा निवडणुकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांत 288 उमेदवारांनी 415 अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी (दि.29) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी 170 इच्छुकांनी 241 अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, दाखल अर्जाची आज बुधवारी (दि.30) रोजी छाननी होणार असून त्यानंतर लगेच पात्र उमेदवारांची यादी त्या-त्या मतदारसंघात प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार असून सोमवारी (दि.4) एकाच दिवशी माघारीसाठी वेळ असून यामुळे राजकीय पक्ष व प्रमुख उमेदवारांसह अनेकांची तारांबळ होणार आहे.
शेवटच्या दिवशी दाखल अर्जात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. बाळासाहेब थोरात, आ. प्राजक्त तनपुरे, शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, आ. लहू कानडे, आ. मोनिका राजळे, हेमंत ओगले, भाऊसाहेब कांबळे, सदाशिव लोखंडे, विठ्ठलराव लंघे, प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले, राजेंद्र नागवडे, अमित भांगरे, संदीप वर्पे, अमोल खताळ, योगेश सूर्यवंशी, जनार्दन घोगरे, सुभाष साबळे, रुपाली भाकरे, शंकर यादव, संजय शेळके, महेंद्र शिंदे, काशीनाथ दाते, अभिषेक कळमकर या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
निवडणूक अर्जासोबत पक्षाचा एबी फार्म न जोडता पक्षाच्या नावाने जोडलेले अर्ज बाद होणार आहेत. यामुळे पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडलेला उमेदवार सध्या निवांत असल्याचे दिसत आहेत. जिल्ह्यात अनेक मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी इच्छुक असणार्यांना उमेदवार न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेले आहेत. ते शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की ऐनवेळी माघार घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष करून नगर दक्षिणेतील श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, नगर शहरात शिवसेना ठाकरे ,राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसच्या अनेक नाराज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे दक्षिणेत महाविकास आघाडीत मोठी बंडखोरी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या कंसात अर्ज
अकोले 13 (16), संगमनेर- 16 (24), शिर्डी- 15 (25), कोपरगाव – 19 (30), श्रीरामपूर- 31 (51), नेवासा – 24 (33), शेवगाव- पाथर्डी- 36 (47), राहुरी- 27 (38), पारनेर- 21 (23), नगर- 27 (37), श्रीगोंदा- 36 (54), कर्जत- जामखेड- 23 (37).
श्रीरामपूर, नेवाशात महायुतीत बिघाडी ?
नगर जिल्ह्यात श्रीरामपूर व नेवासा या दोन मतदारसंघांत महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट अशा दोन्ही पक्षांकडून उमेदवार देण्यात आला असून त्यांना पक्षाचा एबीफॉम देखील देण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये नेमका कोण उमेदवार याबाबत अडचण निर्माण झाली आहे. श्रीरामपूरमध्ये शिवसेनेने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे तर राष्ट्रवादीने आमदार लहू कानडे यांना उमेदवारी दिली आहे. नेवासेमध्ये सेननेे विठ्ठलराव लंके तर राष्ट्रवादीने अब्दुल शेख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यापैकी अधिकृत महायुतीचा उमेदवार कोण?असा प्रश्न आहे.
कर्जतमध्ये दोन पवार व दोन शिंदे
विधानसभेसाठी आ. रोहित पवार या नावाने व आ. राम शिंदे यांच्याशी नाम साधर्म्य असणार्या नावाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. याठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी हे अर्ज भरण्यात आलेले आहेत. रोहित चंद्रकांत पवार व रोहित सुरेश पवार तसेच राम प्रभू शिंदे व राम नारायण शिंदे यांचा समावेश आहे. यामुळे कर्जत-जामखेडमध्ये तीन शिंदे आणि तीन पवार निवडणूक रिंंगणात आहे. यासह विखे समर्थक अंबादास पिसाळ यांनी तिसर्या आघाडीच्या नावे अर्ज दाखल केला आहे.
सर्वाधिक उमेदवार श्रीगोंदा, शेवगाव-पाथर्डीत
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वाधिक उमेदवार हे श्रीगाेंंदा मतदारसंघात आणि शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात प्रत्येकी 36 आहेत. यातील श्रीगोंद्यात 36 उमेदवारांचे 54 तर शेवगाव-पाथर्डीत 36 उमेदवारांचे 47 उमेदवारी अर्ज दाखल आहेत.
श्रीरामपूरमध्ये 51 अर्ज
जिल्ह्यात श्रीरामपूर मतदारसंघात 31 उमेदवारांचे 51 उमेदवारी दाखल झालेले आहेत. जिल्ह्यात विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात श्रीरामपूर तालुका दुसर्यास्थानावर आहे. तर सर्वात कमी उमेदवारांची संख्या अकोले मतदारसंघात 13 असून या 13 उमेदवारांनी 16 अर्ज दाखल केलेले आहेत. शिर्डी मतदारसंघात 15 आणि संगमनेर मतदारसंघात 16 उमेदवारांनी अर्ज दाखल झालेले आहेत.
सुवर्णा कोतकर यांचा अपक्ष अर्ज
नगर शहरात सेनेकडून माजी महापौर भगवान फुलसौंदर, प्रा. शशिकांत गाडे, बाळासाहेब बोराटे, काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, मनसेतर्फे सचिन डफळ व अपक्ष म्हणून माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात किती उमेदवार असतील, हे चित्र 4 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.