माजी ग्रामपंचायत सदस्याची रस्त्यासाठी स्टंटबाजी – सरपंच संगिता दरेकर
सुपा / नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील मौजे वाळवणे येथील तरूण नितीन सुभाष दरेकर हे दरेकर वस्ती रस्त्यासाठी सोमवार दि. ८ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे.
दरेकर यांनी वाळवणे ग्रामपंचायतीला उपोषणाचा इशारा दिलेला असून तशी त्यांनी पत्राद्वारे माहिती ग्रामपंचायत वाळवणे, तहसीलदार पारनेर, गटविकास अधिकारी पारनेर व सुपा पोलीस स्टेशन यांना कळविली आहे.
मौजे वाळवणे येथील दरेकर वस्तीवरील रस्ता नुकत्याच झालेल्या पावसाने अतिशय खराब झाला असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत, रस्त्यात पाणी व चिखल झाल्यामुळे ये – जा करण्यासाठी लागणाऱ्या रस्त्याची अनेक दिवसांपासून प्रचंड दुरवस्था झालेली आहे, मळ्यातील ग्रामस्थांनी व नितीन दरेकर यांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालय वाळवणे येथील सरपंच व ग्रामसेवक यांना सांगूनही सदर रस्त्याचे काम काही आतापर्यंत मार्गी लागु शकलेले नाही या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मळ्यातील ग्रामस्थांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच शाळकरी मुले, दुध उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ, औद्योगिक वसाहतीमधील कामगार, वृद्ध यांना ते – जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
जोपर्यंत ग्रामपंचायत या रस्त्याचे काम मार्गी लावणार नाहीत तोपर्यंत उपोषणापासून मागे हटणार नाही असा इशाराही नितीन दरेकर यांनी दिला आहे. यावर ग्रामपंचायत वाळवणे काय पाऊल उचलते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
विरोधकांची रस्त्यासाठी स्टंट बाजी !
सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्व प्रथम तहसीलदार आदेशानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दरेकर वस्ती रस्ता सिमेंट क्रॉंक्रिटीकरण काम मंजूर झाले होते, परंतु स्थानिक शेतकऱ्यांचा त्यास विरोध असल्यामुळे तो रस्ता होऊ शकला नाही, आता विरोधकांकडून त्याचे भांडवल केले जात आहे, गेली पंचवार्षिक मध्ये स्वतः हा ग्रामपंचायत सदस्य असतांना वस्ती वरील ग्रामस्थांना रस्त्याच्या कामासाठी झूलवत ठेवले. उपोषणाचा स्टंट करण्यापेक्षा त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन रस्ता होवा अशी सहमती घ्यावी आम्ही रस्त्याच्या कामासाठी तत्पर आहोत.
या रस्त्यासाठी पुन्हा शासकीय निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाऊन रस्ता काँक्रिटीकरण केला जाईल.
– संगिता गोरक्षनाथ दरेकर, विद्यमान सरपंच, वाळवणे.