एकाच मैदानावरच दोन आंदोलन
नांदेड | नगर सह्याद्री
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार असतानाच आता ओबीसी समजानेही तेथेच आंदोलनाचा इशारा दिला आहे. तुमच्याकडे दहा लाख गाड्या असतील तर आमच्याकडे दोन हजार गाढव, मेंढरे आहेत, असा इशारा ओबीसी नेते माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मुंबई येथील आंदोलन जसे जवळ येईल, तसे ओबीसी आणि मराठा आंदोलकांमधील घमासान वाढत चालले आहे. मनोज जरांगे पाटील ओबीसी समजातून आरक्षणाची मागणी करीत आहेत, तर ओबीसी समाजाकडून याचा विरोध केला जात आहे. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
येत्या २० जानेवारीला अंतरवाली सराटी येथून जरांगे लाखो मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत. दुसरीकडे ओबीसी समाजानेही २० जानेवारीपासून आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनासाठी मराठा समाजाकडे १० लाख गाड्या असतील तर आमच्याकडे दोन हजार गाढव, मेंढरे तयार आहेत, आम्ही पण आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले.
रविवारी नांदेड जिल्ह्यातील नायगाव नरसी येथे ओबीसी आरक्षण बचाव मेळावा झाला. त्यात ते बोलत होते. मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी खासदार विकास महात्मे, प्रा. टी. पी. मुंडे, सचिन नाईक, अविनाश भोसीकर, महेंद्र देमंगुंडे आदींसह ओबीसी समाजाचे नेते उपस्थित होते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून प्रकाश शेंडगे यांनी टीका केली.
ते म्हणाले, तीन कोटी मराठा, १० लाख गाड्या, एक हजार कोटी डिझेल खर्च करून गरीब मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईला आंदोलन करणार आहे. गरीब मराठ्यांचे आंदोलन हे आरक्षणासाठी नसून ओबीसी समाजाचे आरक्षण धोयात आणण्यासाठीच आहे. तुम्ही आमच आरक्षण धोयात आणण्यासाठी आंदोलन करणार आहात तर, आम्ही पण आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरच आंदोलन करणार आहोत. तुमच्याकडे १० लाख गाड्या असतील, पण आमच्याकडे हजारो गाढव, डुकर, मेंढर्या असून त्यांना घेऊन आझाद मैदानावर आंदोलन करू. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत, याच मैदानावर ओबीसी समाजही २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आम्ही सर्वात प्रथम मैदानाची मागणी केली आहे. तीन कोटी मराठा आंदोलकासाठी हे मैदान कमी पडणार आहे, तेव्हा शासनाने त्यांना दुसरे मैदान द्यावे, असे शेंडगे म्हणाले.