अहमदनगर। नगर सहयाद्री-
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एक ट्विस्ट समोर आली आहे. लोकसभेसाठी भाजपच्यावतीने खा. डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीच्यावतीने नीलेश लंके यांच्यात काटो की टक्कर होणार आहे. शेवटच्या दिवशी एका पक्षाने अर्ज दाखल केल्याने तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दाखल अर्जाची एकूण संख्या किती?
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दाखल अर्जाची एकूण संख्या ही ४३ वर पोहचली आहे. गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २७ उमेदवारांनी ३२ अर्ज दाखल केले अहमदनगर लोकसभेसाठी भाजपच्यावतीने खा. डॉ. सुजय विखे पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्यावतीने नीलेश लंके यांच्यासह अन्य इच्छुकांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे.
दक्षिण लोकसभा निवडणुकीत ट्विस्ट!
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता नवा ट्विस्ट आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एमआयएमचे उमेदवार डॉ. परवेज अशरफी मैदानात उतरले आहे. महायुतीचे डॉ. सुजय विखे व महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या दुरंगी लढत होणार होती. पण आता एमआयएम व वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने लढतीत रंगत आली आहे.
दाखल अर्जाची आज छाननी होणार
आज दि. २६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छानणी करण्यात येणार आहे. २९ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. नगर लोकसभेसाठी मोठ्या संख्येने ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या ठिकाणी इच्छुकांची मोठी गर्दी झाली असून आज दाखल अर्जापैकी किती अर्ज वैध ठरणार आणि किती अवैध ठरणार हे कळणार आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रणांगणात गुरुवारी नवा भिडू दाखल झाला आहे. एमआयएम तर्फे डॉ. परवेश अशरफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. अशरफी निवडणुकीच्या मैदानात आल्याने अल्पसंख्यांक मतांवर डोळा ठेऊन असलेल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. डॉ. अशरफीच्या रुपाने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. अहमदनगर दक्षिण नगर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना त्यात आता एमआयएमने उडी घेतल्याने या निवडणुकीला चांगलीच रंगत येणार आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आधीच महविकास आघाडीवर कुरघोडी करत प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नसल्याने आयता उमेदवार घेऊन निलेश लंके यांना मैदानात उतरविले. पण तोवर वेळ निघून गेली होती. कारण डॉ. सुजय विखे यांनी तोपर्यंत संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढत मतदारांच्या गाठी भेटी वाढवत आपले वातावरण तयार केले आहे.
यामुळे महाविकास आघाडीने मतदार संघातील अल्पसंख्याक समाजावर आपले लक्ष केंद्रीत करत त्यांना आपल्या गळाला लावण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे. पण आता खुद्द एमआयएम ने आपला गडी रिगंणात दिल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेची वातावर आहे. एमआयएम ने दिलेले उमेदवार डॉ. परवेश अशरफी हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
महाविकास आघाडीने केवळ अल्पसंख्यांक मतांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला असून राज्यात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही. यामुळे अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे डॉ. अशरफी यांनी सांगितले. त्यांना जनता आता किती साथ देणार हे तर ४ जूनला समोर येईल. पण दक्षिण लोकसभा मतदार संघात एमआयएम दाखल झाल्याने तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.