पारनेर । नगर सहयाद्री
सुपेकरासाठी गोड बातमी समोर आली आहे. गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एक मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर औद्योगिक वसाहतीमधून सुपा ग्रामपंचायतीला दररोज ३ लाख लिटर पाणी मिळणार आहे.
गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच मनीषा योगेश रोकडे, माजी उपसरपंच दत्तात्रय पवार, सागर मैड, पप्पू पवार, प्रताप शिंदे, सुरेश नेटके, सदस्य अनिता पवार, युवा नेते योगेश रोकडे यांनी सुप्याची नोंदणीकृत लोकसंख्या व आज रोजी सुप्यात वास्तव्यास असलेले नागरिक यांची तफावत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या समोर मांडली.
सुप्यासाठी काम सुरू असलेली विसापूर पाणी योजना चालू होईपर्यंत सुपा औद्योगिक वसाहतीतून पाणी सोडावे अशी विनंती केली. विखे पाटील यांनी तात्काळ औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
औद्योगिक वसाहतीचा पुरवठा होऊन ३ लाख लिटर पाणी देणे शक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करताच लगेचच याबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली. ग्रामपंचायत पदाधिकारी व औद्योगिक वसाहत पाणीपुरवठा अधिकारी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते सुपा शहरासाठी पाणीपुरवठा चालू केला.