अहमदनगर। नगर सहयाद्री
महापालिका प्रशासनाने कॅलिब्रेशन करून जल मापक यंत्र न बसवल्याने मुळा पाटबंधारे विभागाकडून दुप्पट दराने पाणीपट्टी आकारली जात आहे. या पाणीपट्टीचे एप्रिलपासून ऑटोबरपर्यंत बिलाचे ६.९७ कोटी रुपये महापालिकेने थकवल्याने कोणत्याही क्षणी पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा मुळा धरण शाखाधिकार्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र जलसंपती नियमन प्राधिकरण अधिनियम अन्वये बिगर सिंचन ग्राहकांनी नोंदणीकृत संस्थेकडून कॅलिब्रेशन करून जल मापक यंत्र बसविणे आवश्यक आहे. मुळा शाखा कार्यालयाने महापालिकेला जलमापक यंत्राचे नोंदणीकृत संस्थेकडून कॅलिब्रेशन करण्याबाबत वारंवार कळविले. अद्याप महापालिकेने तसे प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे मनपाला दुप्पट दराने आकारणी होत आहे. तसेच, सद्यस्थितीत मुळानगर येथील पंपगृहात तीन पैकी एक जलमापक बंद असल्याचे पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, ऑटोबर अखेर मनपाकडे ६ कोटी ९७ लाख ५० हजार २१९ रुपये बिगर सिंचन पाणीपट्टी थकीत आहे. मनपा प्रशासनाने १८ लाख ९७ हजार ८८ रुपये डिसेंबर महिन्यात भरले आहेत. सर्व जल मापकांचे नोंदणीकृत संस्थेकडून कॅलिब्रेशन करून प्रमाणपत्र सादर करावे. तसेच, उर्वरित पाणीपट्टी त्वरित भरावी, अन्यथा पाणी पुरवठा कुठल्याही क्षणी खंडित करण्यात येईल, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.