मुंबई। नगर सहयाद्री-
राज्यात दोन ते तीन दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून सकाळी आणि संध्याकाळी गुलाबी थंडीला सामोरे जावे लागत आहे. अरबी समुद्रासह घडलेल्या बदलामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाला असून तापमानात किंचित वाढ झाली आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सरत्या वर्षाला निरोप देताना थर्टी फर्स्टला राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील हवामानात चढ-उतार होत आहे. राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रावर बाष्पयुक्त ढग निर्माण झाल्यामुळे राज्यासह 30 डिसेंबरपासून 2 जानेवारी दरम्यान राज्यात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अहमदनगर, पुणे, जळगाव, कोल्हापूर आणि महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक थंडी आहे. २ जानेवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.