नगर तालुका भाजपच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
जिल्ह्यात तीन एमआयडीसी मंजूर झाल्या असून या एमआयडीसीतून जिल्ह्यात किमान दहा हजार भूमिपुत्रांना रोजगार निर्माण होईल. उद्योजकांची बैठक घेऊन एमआयडीसीमधील खंडणीबहाद्दरांचा बंदोबस्त केला जाईल. गोदावरी खोऱ्यात 65 टीएमसी पाणी आणून नगर-नाशिकचा पाण्याचा वाद मिटवणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
आमदार शिवाजी कर्डिले, युवा नेते अक्षय कर्डिले व नगर तालुका भाजपाच्यावतीने पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती व महायुतीचे आमदारांचा सत्कार सोहळा सहकार सभागृह येथे आयोजित केला होता. यावेळी विखे पाटील बोलत होते.
यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, संग्राम जगताप, मोनिका राजळे, काशिनाथ दाते, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, अमोल खताळ, माजी खासदार सुजय विखे पाटील, भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अनिल शिंदे, संपत बारस्कर, विनायक देशमुख, अशोक सावंत, बाबुशेठ टायरवाले, तालुकाध्यक्ष दिपक कार्ले, सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ यांच्यासह नगर तालुका महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, लाडकी बहिणींमुळे राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. त्यांची प्रतिनिधी म्हणून मी एकटीच महिला आमदार आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये होणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेवगाव-पाथड तालुक्यात व्हावे. लाडक्या बहिणींची इच्छा सभापती, पालकमंत्री मान्य करतील अशी अपेक्षा आ. राजळे यांनी व्यक्त केली. यावेळी आ. जगताप, खताळ, पाचपुते, लंघे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपा युवा नेते अक्षय कर्डिले यांनी प्रस्ताविक केले. बाजार समिती संचालक संतोष म्हस्के यांनी आभार मानले.
माझं पुनर्वसन करा; सुजय विखेंनी घातली साद
जेव्हा मी आजी होतो, तेव्हा अनेकजण माजी होते. त्यावेळी तुम्हाला गप्पा मारायला चार-पाचजण होते. आता मी एकटाच माजी असल्याने कोणाकडे जायचे हा प्रश्न आहे. त्यामुळे या अधिवेशनातच आमदार कर्डिले माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम हाती घेतील, असं म्हणत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पुनर्वसनाच्या मुद्द्याकडे पक्षातील नेत्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या आमदार शिवाजी कर्डिले यांच्या म्हणण्याप्रमाणे होत आहे. त्यांनी राम शिंदे यांना विधान परिषेदत आमदार करण्याचा ठराव केला होता. ते आमदार झाले, नामदारही झाले. त्यामुळे माझ्यासाठी काय देणार आहात, याचा खुलासा करून टाकावा. यानंतर जिल्ह्याची धुरा व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाऊ असे सुजय विखे पाटील म्हणाले. दरम्यान, यानंतर आमदार मोनिका राजळे, संग्राम जगताप, काशीनाथ दाते, अमोल खताळ, विक्रम पाचपुते, विठ्ठल लंघे यांनीही आपल्या भाषणात सुजय विखे-पाटील यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उचलून आमदार कर्डिले यांना पुढाकार घेण्याची विनंती केली. तुम्ही काळजी करू नका. सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला राज्यसभेवर पाठवू असे कर्डिले म्हणाले. सभापती राम शिंदे यांनी सुजय विखेंना सबुरीचा सल्ला दिला.
त्यांची इज्जत 622 मतांनी जास्त;प्रा. राम शिंदे
काही लोक म्हणाले मला प्रोटोकॉल कळत नाही. मी अडीच वर्ष प्रोटोकॉ मंत्री होतो. सभागृहाचा अध्यक्ष पक्षाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो हे निवडणूक आयोगाने सांगितले. बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन त्यांनी नाद केला म्हणून मी नाद केला. साठ वर्षाची त्यांची परंपरा आहे. चार वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा उपमुख्यमंत्री, केंद्रात मंत्री, विरोधी पक्षनेते अशी पदे भोगली. त्यांची आणि माझी तुलना केली तर त्यांची इज्जत 622 मतांनी जास्त आहे अशी टीका विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पवार परिवारावर केली.
डॉ. सुजय विखेंना वर्षभरात राज्यसभेवर पाठविणार; आ. शिवाजी कर्डिले
विधानसभा निवडणुकीत विखे कुटुंबियांमुळेच जिल्ह्यात महायुतीचे 10 आमदार निवडून आले आहेत. आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात फक्त जीरवा जीरवीचे काम झाले. आता जिल्ह्यात महायुतीची मोठी ताकद तयार झाली आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पाण्याबाबत नेहमीच आपल्यावर अन्याय व्हायचा. परंतु, जलसंपदा खाते आता मंत्री विखे पाटलांकडे असल्याने पाण्यावरील अन्याय होणार नाही. जलसंपदा खाते विखेंना मिळताच साकळाई योजनेला मंजुरी मिळाली आहे. पुढील अडीच वर्षात आम्हाला मंत्री पदाची संधी मिळाली नाही तरी चालेल पण आम्हा विकासकामांसाठी मोठा निधी देण्याची मागणी आ. शिवाजी कर्डिले यांनी यावेळी केली. 10 आमदार निवडून आणण्यात डॉ. सुजय विखे पाटील याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांना सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरातच राज्यसभेवर पाठवणार असल्याचे आ. कर्डिले म्हणाले.