मुंबई | नगर सहयाद्री
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले असताना, आता मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यातील संघर्ष चांगलाच टोकाला गेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधताना मंत्री भुजबळांनी, तू कोण आहेस रे? असा सवाल करत त्यांना थेट निवडणुकीत उतरण्याचे आव्हान दिले आहे.
सरकारकडून हैदराबाद गॅझेटवर आधारित मराठा आरक्षणासाठीचा जीआर जारी करण्यात आल्यानंतर ओबीसी समाजात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. ओबीसी समाजाच्या या संतप्त भावना आता आंदोलनाच्या रूपात प्रकट होऊ लागल्या आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये ओबीसी समाजाने जीआर रद्द करण्याची जोरदार मागणी करत एल्गार पुकारला, तर १७ ऑक्टोबरला बीडमध्ये छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली अंदोलन होणार आहे.
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली, मात्र भुजबळांनी दिलेल्या निवडणुकीच्या आव्हानावर मात्र त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर, ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष आणखी तीव्र होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत