नवी दिल्ली / नगर सह्याद्री : केंद्रातील भाजप सरकार खाली खेचण्यासाठी सध्या इंडिया आघाडी चांगलीच जोर लावून राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी आता इंडिया आघाडी नाव फिक्स करत आहेत. यासंदर्भात ‘इंडिया’ आघाडीची मंगळवारी नवी दिल्लीत बैठक संपन्न झाली. आता
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक लढताना कोणाचा चेहरा घेऊन लढायचं यावर ‘इंडिया’ आघाडीने नाव निश्चित केलं आहे. १६ पक्षांच्या नावाचा पाठिंबा मिळाला असल्याचेच बोलले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी दलित चेहरा घेऊन भाजपाला आव्हान देण्याची मोर्चेबांधणी ‘इंडिया’ आघाडीने केली आहे. आघाडीमधील नेत्यांनी मोदींविरुद्ध लढण्यासाठी कोणत्या नेत्याचा चेहरा वापरावा यासंदर्भातील चर्चेमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नावाचा प्रस्ताव ठेवला आहे.
दरम्यान यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना खरगेंनी, “आधी एकत्र येऊन जिंकू, मग पंतप्रधानपदाचा विचार करु,” असं म्हटलं. आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि द्रमुकचे नेते तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलनि यांनी खरगेंच्या नावाला पाठिंबा दर्शवला. ‘इंडिया’ आघाडीतील 28 पैकी 16 पक्षांनी खरगेंच्या नावाला पाठिंबा दिला आहे.
खरगेच का?
‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीमध्ये, नरेंद्र मोदींसमोर उभे राहू शकतील असे एकमेव विश्वासार्ह, अनुभवी नेते खरगेच आहेत. दलित व आदिवासी हे काँग्रेसचे पारंपारिक मतदार भाजपाने जाणीवपूर्वक हिरावून घेतले आहेत. त्यासाठी दलित किंवा आदिवासी चेहऱ्यांची काँग्रेसला गरज होती. खरगे हे ‘इंडिया’मधील घटक पक्षांनाही आपलेसे वाटतात. रामनाथ कोविंद व द्रौपदी मुर्मू या भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या
उमेदवारांच्या विरोधात काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे काँग्रेस दलित व आदिवासीविरोधात असल्याचे चित्र भाजपने निर्माण केले आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी खरगे हेच उत्तम उमेदवार असल्याचं या बैठकीतील मुद्द्यामध्ये नमूद करण्यात आल्याचं समजतं.