spot_img
अहमदनगरवाफारेसारख्या अवलादींचे समूळ उच्चाटन कधी होणार?

वाफारेसारख्या अवलादींचे समूळ उच्चाटन कधी होणार?

spot_img

शंभरपेक्षा जास्त ठेवीदारांनी जीव सोडल्यानंतर मिळालेला न्याय हा न्याय म्हणायचा का? संचालक होताना आता तरी घ्या काळजी!

सारिपाट / शिवाजी शिर्के

पोपटासारखा टमाटमा बोलणारा आणि फक्त बोलघेवडे पणावर भल्याभल्यांची दाद मिळविणार्‍या ज्ञानदेव वाफारे याला १३ वर्षानंतर संपदा पतसंस्थेतील कथीत घोटाळ्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. खरेतर या शिक्षेला खूप उशिर लागलाय! शंभरपेक्षा जास्त ठेवीदारांनी आपली ठेव मिळेल याकडे नजरा लावत त्यांचा जीव सोडला. संपदामध्ये जे घडलं त्यास सर्वस्वी ज्ञानदेव वाफारे हाच कारणीभूत! त्याच्यावर अंधळा विश्वास ठेवत अन्य संचालकांनी सह्या केल्या अन् त्यात अलगद अडकले! गडबड चालू असल्याचे लक्षात येताच काहींनी सह्या करणे बंद केले आणि ते वाचले! मात्र, कोण वाचले आणि कोणाला शिक्षा लागली याहीपेक्षा ज्ञानदेव वाफारे सारख्या अवलादी यापुढे जन्माला येणार नाही याची काळजी समाजालाच घ्यावी लागणार आहे. बँका, पतसंस्था यासारख्या कोणत्याही आर्थिक संस्थांमध्ये संचालक म्हणून काम करण्यास जाणार असाल तर त्यातील आपल्याला कितीपत समजते आणि त्या संस्थेतील ‘मुखिया’ संचालकांना कितपत विश्वासात घेतो यावरच सारे अवलंबून आहे. संपदामध्ये आज दोषी ठरविण्यात आलेल्या अंशी टक्के संचालकांना ज्ञानदेव वाफारे कुठे माती खाल्ली आणि कोणत्या डान्सबारमध्ये काय-काय दिवे पाजळले याची काहीच माहिती नाही! जन्मठेप झालेले पाचजण वगळता अन्य दोषींना कमीअधिक फरकाने शिक्षा देण्यात आलीय! अर्थात, न्यायालयाचा निर्णय आणि संस्थेतील सामुदायीक जबाबदारीतून त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेचा विचार करता त्यातून आता बाकींच्यांनी बोध घेण्याची गरज आहे. वाफारेने कोट्यवधींचा घोटाळा केल्यानंतरही त्याला समाजात सन्मान देण्यास पुढे आलेली एक टोळी होती. आता वाफारेसाठी सरसावलेल्या या टोळ्यांना शोधून त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला तर वाफारे सारखे धाडस अन्य पतसंस्थांमधील कारभारी करणार नाहीत!

ज्ञानदेव वाफारे हा सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला! मात्र, त्याला प्रचंड महत्वाकांक्षा! त्यातूनच त्याने कान्हूरपठार पतसंस्थेत तत्कालीन आमदार स्व. बाबासाहेब ठुबे यांनी स्थापन केलेल्या कान्हूरपठार पतसंस्थेत कान्हूरपठारमधील त्याच्या नातेवाईक- मित्रांना हाताशी धरले आणि बाबासाहेब ठुबे यांच्या ताब्यातून ही संस्था काढली. स्वत: चेअरमन झाला. या संस्थेतील कर्मचारी आणि शाखा विस्तार या बळावर त्याने तालुक्यात आमदारकीचे स्वप्न पाहिले. त्यासाठी संस्थेचा आणि संस्थेच्या कर्मचार्‍यांचा त्याने मनमानी वापर सुरू केला. शिवसेनेचा जागर सुरू होताच त्याने राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला. वाफारे याला त्यावेळी पैशांची मोठी गरज होती आणि संस्थेचे व्यवस्थापक असलेले दिलीप ठुबे त्याआड येत होते.

संस्थेतील एक रुपया देखील हातावर देणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने कामकाज होऊ देणार नाही अशी भूमिका स्व. दिलीपराव ठुबे यांनी त्यावेळी घेतली. त्यातून मग वाफारे याने दिलीप ठुबे हटाव मोहीम हाती घेतली आणि दिलीप ठुबे यांच्या जागेवर पर्यायी सहाय्यक व्यवस्थापक हे पद निर्माण करण्यात आले. या पदासाठी मलाच (शिवाजी शिर्के) गळ घालण्यात आली होती. त्यानुसार साधारण महिनाभर त्या संस्थेत काम करत असताना येथे मोठी गडबड होणार असल्याचा अंदाज आम्हाला आला. त्याचवेळी दिलीपराव ठुबे यांनी संस्थेतील त्यांच्या केबीेनमध्ये बोलावून चर्चा केली आणि माझ्या जागेवर तुम्हाला (शिवाजी शिर्के) बसविण्याचा डाव आहे आणि मला येथून काढले जाणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याक्षणाला मी निर्णय घेतला आणि माझा निर्णय मी दुसर्‍या दिवशी ज्ञानदेव वाफारे यांना कळवला की, मी आजपासून संस्थेत येणार नाही. यानंतर पुढच्याच आठवड्यात माझी दैनिक लोकमत जालना कार्यालयात उपसंपादक म्हणून नियुक्ती झाली.

वाफारे हा संस्था अडचणीत आणू शकतो याची जाणिव झालेल्या दिलीपराव ठुबे यांनी लागलीच अन्य संचालकांना याची माहिती दिली आणि या संस्थेतून वाफारे याची हकालपट्टी झाली. मोठा अन्याय झाला असल्याचा कांगावा करत गावोगावी रडारडीच्या सभा झाल्या आणि या वाफारे याने निवडक सहकार्‍यांना हाताशी धरून संपदा पतसंस्थेची स्थापना केली. वाफारे हा एसटी बसने प्रवास करु लागला. साहेब एसटीने प्रवास करत असल्याची चर्चा झडली आणि मग अनेकांनी पुढाकार घेत त्याच्यासाठी चार चाकी वाहन घेण्यासाठी लोकवर्गणी जमा केली. त्यातून टोयोटा कंपनीची क्वालीस ही अलीशान गाडी खरेदी करण्यात आली. यानंतर वाफारे व त्याची ही क्वालीस प्रचंड सुसाट सुटली. चितळे रोडवर संपदाचे मुख्य कार्यालय थाटले गेले. शाखांचा विस्तार झाला. दोन-तीन वर्षे बर्‍यापैकी चांगले चालले असताना ज्ञानदेव वाफारे यांचा अत्यंत विश्वासू सहकारी बाळासाहेब सुंबे हे आजारी पडले आणि त्या आजारपणात काही वर्षे अंथरुणाला खिळून ते गतप्राण झाले. यानंतर वाफारे याला कोणाचीच आडकाठी राहिली नाही.

वाफारे- रविंद्र शिंदे आणि साहेबराव भालेकर या त्रिकुटाने नंगानाच चालू केला. संचालकांना काहीच समजत नव्हते. मात्र, काही संचालकांना थेट पनवेल- खोपोलीतील डान्सबार दर्शन घडवले जात होते. शिंदे- भालेकर हे दोघे मिळून सारे काही करत होते आणि त्याचवेळी दुसरीकडे संजय बोरा हा या दोघांकडील सोनेतारणातून लाखोंची माया कमवून देत राहिला. ठेवीदारांच्या ठेवी मिळत नसल्याची ओरड सुरू झाली आणि सोनेच बनावट निघाल्याचा भांडाफोड झाला. अनिल राठोड यांनी आवाज उठवला आणि तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या पथकाने संस्थेच्या मुख्यालयात धाड टाकून वाफारे याला अटक केली. वाफारे याच्या अँटी चेंबरची झडती घेतली असता त्या चेंबरच्या गाद्यांखाली कन्डोमची पाकीटे सापडली अन् पोलिस अधिकार्‍यांनी कपाळावर हात मारुन घेतला. यानंतर संपदातील अनेक किस्से आणि भानगडी पुढे आल्या. ठेवीदारांना फक्त आणि फक्त मनस्ताप सहन करावा लागला. साडेतेरा कोटीच्या घोटाळ्यात पाचजणांना जन्मठेप झालीय! मात्र, या संस्थेत अनेक पेन्शनरांनी ठेवी ठेवल्या होत्या. त्यातील शंभरपेक्षा जास्त जणांनी जीव सोडला तरी त्यांना ठेव रक्कम मिळाली नाही. आता शिक्षा सुनावण्यात आली असली तरी ठेवीदारांना मिळणार्‍या ठेवीचे काय?

संपदातील या प्रकरणातून खरे तर बोध घेण्याची गरज आहे. संपदाचा निकाल लागला असताना जन्मठेपेची बातमी तुम्ही- आम्ही वाचत असतानाच दुसरीकडे त्याच तालुक्यातील मळगंगा, राजे शिवाजी, गोरेश्वर या सारख्या पतसंस्थांमधून ठेवीदार वार्‍यावर आले आहेत. खरेतर खासगी सावकारकी संपविण्यासाठी सहकाराचा आणि पतसंस्थांचा जन्म झाला. मात्र, अलिकडच्या काळात या संस्था म्हणजे त्या- त्या संस्था चालकांच्या कौटुंबिक जहागिर्‍या झाल्या सारख्या ते या पतसंस्था चालवतात (नव्हे हाकतात). स्वैराचार त्यांच्यात इतका बोकाळला आहे की ते कोणालाच मोजायला तयार नाहीत. यातील काही संस्थांचा पर्दाफाश आम्ही करणार आहोतच! मात्र, त्याहीपेक्षा कोणत्याही आर्थिक संस्थेत संचालक म्हणून काम करण्याआधी आपण त्या संस्थेला वेळ देऊ शकतो का? आपल्याला सहकार आणि आर्थिक पत्रके समजतात का? कर्जवितरण आपल्याला विचारात घेऊन होते का आणि वसुली कशी होते यागोष्टींचा विचार होण्याची गरज आहे. या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर आपण त्या लायकीचे नाही असे समजून अशा संस्थांमध्ये संचालक म्हणून राहण्यात काहीच अर्थ नाही.

दुसरा वाफारे जन्माला येऊ द्यायचा नसेल तर…!
वाफारे याच्यावर अंधळा विश्वास ठेवत आज दोषी ठरलेल्या संचालकांचे हेच चुकले! ठेवीदारांनी बोलघेवडा आणि ब्रँडेड कपडे घालणारा, चांगले वाहन वापरणारा पदाधिकारी पाहण्यापेक्षा त्याचे उत्पन्नाचे साधन काय हे तपासून पाहण्याची गरज आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना अनेक पतसंस्था पदाधिकारी आणि त्यांचा रोजचा खर्च सर्वांनाच आत्मपरिक्षणास भाग पाडणारा आहे. संपदामधून सार्‍यांनीच बोध घेण्याची गरज आहे. मात्र, ज्याने हजारो गोरगरीबांना गंडा घातला त्या वाफारे याला मध्यंतरीच्या काळात दहावा, लग्न आणि अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये मानाचे स्थान ज्यांनी- ज्यांनी दिले त्या सार्‍यांनाच आता ठेवीदारांसह समाजाने गावागावातून वाहणार्‍या ओढ्यातील निरगुडीचा फोक काढावा आणि त्याच्या या अंधभक्तांच्या पार्श्वभागावर या फोकाने आणि लाथांनी प्रसाद द्यावे! त्यातून पुन्हा दुसरा वाफारे जन्माला येणार नाही इतकेच!

 

 

 

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादी विधानसभेला एकत्र लढणार की स्वबळावर? मोठी माहिती आली समोर..

मुंबई। नगर सहयाद्री विधानसभेच्या पाश्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून रणनीती आखण्यास सुरवात झाली आहे. शिवसेना पक्षाचे...

का झाला शिर्डीत पराभव? माजी खा. लोखंडे यांनी स्पष्टच सांगितले ‘कारण’

अहमदनगर | नगर सह्याद्री अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांचा भाजपला राजकीय फायदा होणार असे गणित...

शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत ‘हे’ तालुके ठरणार ‘निर्णायक’, कुणाला मिळणार आघाडी? वाचा सविस्तर..

अहमदनगर । नगर सहयाद्री- विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ तारखेला मतदान...

महायुतीला वेध लागले मंत्रिमंडळ विस्ताराचे? नगरमधून ‘यांच्या’ नावांची जोरदार चर्चा

मुंबई । नगर सहयाद्री- लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर विधानसभेला सामोरे जाण्यापूर्वी राज्यात महायुतीला मंत्रिमंडळ विस्ताराचे...