अहमदनगर । नगर सहयाद्री
राज्यात तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. राज्यात आता चौथ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नगरच्या मैदानात सभांचे मॅरेथॉन रंगल्याचे पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यापाठोपाठ, ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. संजय राऊत, मंत्री धनंजय मुंडे यांच्या सभा झाल्या आहेत. आता शुक्रवार दि. १० मे रोजी राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांची पारनेरमध्ये सभा पार पडणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नगरमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ४ जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असून त्यानंतर या आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी मिळणार नाही.
तसेच गेली पन्नास वर्ष एक आत्मा महाराष्ट्रात फिरत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ श्रीगोद्यात पार पडलेल्या सभेत शरद पवार यांनी मोदींच्या वक्तव्यावर पलटवार करत हा आत्मा ५० वर्ष नाही तर ५६ वर्षापासून हिंडतोय. मला विधानसभेत येऊन यंदा ५६ वर्ष झाली असल्याचे सांगत त्यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. तसेच नगरमध्येही लंके यांच्यासाठी सभा घेत मोदी सरकारवर सडकून टीका केली.
शेवगावमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांची सभा झाली. त्यांनी देशात मोदींशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगत खा. सुजय विखे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि.१० रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे पारनेरमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
परंतु विरोधी असलेले उमेदवार आ. नीलेश लंके हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत लोकसभेच्या आखाड्यात महाविकास आघाडीकडून उमेदवारी केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आयोजीत सभेत नेमकं काय बोलणार याकडे अहमदनगर लोकसभा मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे.