अहमदनगर । नगर सहयाद्री:-
रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी एकरुखे शिवारात एका घराचा दरवाजा तोडून झोपलेल्या पती-पत्नीच्या तोंडावर स्प्रे मारून त्यांना बेशुध्द केले. नंतर त्यांनी घरातील सव्वा तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून नेला.
राहाता पोलिसांत बजरंग हरी गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ११ ऑगस्टच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी किचन रुमचा कडी कोयंडा तोडला. त्यांनी एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे गंठन, एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी आणि पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ३ लाख २९ हजार रुपयांचा माल वापरण्याचे कपडे घेऊन पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच राहाता पोलीस घटनास्थळी पोहचले. श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे वाहनात बसून फरार झाल्याचे निष्पन्न झाले. राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे.