जालना। नगर सहयाद्री-
आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे, असे नियोजन आखले जात आहे. सरकारी अधिकार्यांकडूनच मला ही माहिती मिळाली, असा गौप्यस्फोट मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच सरकार मला शब्दात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याची घोषणा केली. त्यानंतर २० जानेवारीपर्यंत मुंबईला पोहोचण्याची तयारी मराठा आंदोलकांकडून सुरू आहे. त्या दरम्यान जरांगे पाटील यांनी सरकारच्या काही पडद्यामागील हालचालींबाबत साशंकता व्यक्त केली. मला शब्दात अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शयता आहे. आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे, असे नियोजन आखले जात आहे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. ही माहिती मला सरकारी अधिकार्यांकडूनच मिळाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आम्ही आमच्या स्वयंसेवकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. आमच्या आंदोलनात कुणी हिंसाचाराचा प्रयत्न करतोय का, यावरही बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना स्वयंसेवकांना दिल्याचे ते म्हणाले.
जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, सरकारमधील मंत्र्यांची काल रात्री बैठक झाल्याची माहिती मला मिळाली. काही जणांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. मी या माहितीची खातरजमा करत आहे. लवकरच हे मंत्री कोण आहेत, याचीही नावे कळतील. मंत्र्यांच्या चर्चेत काहींनी आरक्षणाला विरोध केला, तर काहींनी आमच्या मुंबईतील आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय दिला आहे. सरकारकडून माझ्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी मराठा समाजाच्या आंदोलनातून पुढे येऊन ज्यांनी राजकीय दुकानदारी सुरू केली होती, त्या लोकांना पुढे करून माझा विरोध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांना पत्रकार परिषदा घेण्याचे आणि वृत्तवाहिनीवरील चर्चांमध्ये सहभागी करून विरोधात बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझ्याविरोधात ट्रॅप रचण्याची तयारी केली जात आहे.
मी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागत आहे. माझ्या मागणीला सहा कोटी मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. सरकारने पाच-पन्नास मराठा नेत्यांना हाताशी धरून षडयंत्र रचण्याचा डाव रचला आहे. माझ्यामुळे अनेकांची दुकानदारी बंद झाली. हे सर्वात मोठे या लोकांचे दुखणे आहे. समाजाच्या नावावर नेतेगिरी करणारे भूईला टेकले आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने अशा लोकांना पाठपळ दिले जात आहे.
जरांगे पाटील म्हणाले, मला अशीही माहिती मिळाली की, गुजरातमधून फोर्स मागविला आहे. कदाचित तो सुरक्षा व्यवस्थेसाठीही मागितला गेला असेल. मी उगाच बिनबुडाचे आरोप करणार नाही. बीड किंवा संभाजीनगरमध्ये फोर्स आला आहे, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनीच दिली आहे. मला अधिकृत माहिती मिळालेली नाही. मी शहानिशा करून याबद्दलचे सत्य मराठा समाजासमोर लवकरच आणेल. सरकारने कितीही षडयंत्र केले तरी मी मागे हटणार नाही. सरकारला आमची कत्तल करावी लागेल. मराठा समाजाच्या आंदोलनाचे इतके दडपण सरकारने का घेतले आहे? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जितया बैठका घेतल्या, त्यापेक्षा अधिक बैठका आंदोलन चिरडण्यासाठी केल्या जात आहेत, असाही आरोप जरांगे पाटील यांनी केली.