औटींच्या विचाराचा मुख्यमंत्री असताना त्यांचे समर्थक विनाकारण पोलिस ठाण्यात डांबले जात होते! / पाठीशी कोणीच नाही तरीही उमेदवारी; स्वत:च स्वत:च्या पोस्ट शअर कराव्या लागण्याची नामुष्की!
सारिपाट / शिवाजी शिर्के
मागील पाच वर्षात अनेक शिवसैनिक आणि गाव कारभार्यांना निलेश लंके व त्यांच्या समर्थकांनी ‘किती’ आणि ‘कशी’ वागणूक दिली! कितीजणांना पोलिस ठाण्याची हवा दिली हे विजयरावांना समजलेच नसेल का? त्यांचाच मुख्यमंत्री होता! माझे काहीच चालत नाही, मी हतबल आहे! तुमच्या पातळीवर तुम्हीच कसे करायचे ते पहा,’ असा सल्ला त्यावेळी विजयराव द्यायचे! पाच वर्षात विजयरावांनी कोणालाच कोणतीच सरकारी पातळीवर मदत केली नाही. उलटपक्षी निलेश लंके हे किरकोळ कार्यकर्त्यासाठी ग्रामपंचायतीपासून ते तहसील कार्यालयापर्यंत ठाणू मांडून राहायचे! सहज काम झाले नाही तर घोडे-कुत्रे लावून त्यांनी कार्यकत्यांंची कामे मार्गी लावली आणि इकडे हे विजयराव दिवसभर बंगल्यात बसून राहायचे! त्यातून थोडाफार वेळ मिळाला तर करंडी शिवारातील फार्म हाऊसकडे जायचे! त्यातून वेळ मिळाला तर तिकडेच बैठक मारायचे आणि इकडे त्यांचे समर्थक कोणीच वाली नसल्याच्या भावनेने विरोधकांच्या दावणीला बांधलेल्या अधिकार्यांकडून पोलिस कोठडीत विनाकारण डांबले जायचे! सत्तेत असूनही माझे काहीच चालत नव्हते, असेच त्यांचे उत्तर असेल तर आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडून दिल्यानंतर तुम्ही कोणता दिवा लावणार आहात याचे उत्तर पारनेरकरांना हवे आहे. ‘ विजयराव मैदानात: जिंकण्यासाठी नव्हे पाडण्यासाठी; पण कोणाला?’ या मथळ्याखालील ‘सारिपाट’ प्रसिद्ध होताच रात्री उशिरा ‘मी माघार घेतली नाही’ असा आशय असणारा विजयरावांचा व्हिङीओ त्यांना स्वत:च शेअर करावा लागला यात बरेच काही आहे. मुळात विजयरावांनी माघार घेतली असा दावा कोणीच केलेला नाही. त्यांची उमेदवारी कोणाच्या तरी विजयासाठी असल्याची चर्चा का झडतेय? मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सेनेचा म्हणजेच औटींचा नेता मुख्यमंत्री झाला असताना हेच औटी पाच वर्षे उघड्याडोळ्याने त्यांच्या समर्थकांना चोपलेले, पोलिस ठाण्यात डांबलेले पाहत बसले! त्यांची जर ती हतबलताच होती तर मग आज अपक्ष उमेदवारी करून ते काय साध्य करु इच्छितात? ज्यांच्यामुळे समर्थकांना प्रचंड त्रास झाला, त्यांच्या अंगावर जखमा झाल्या त्यांच्याशीच बाजार समितीत औटींनी गळ्यात गळा घातला. साध्या सातशे लोकवस्तीचे गाव असणार्या सरपंचासह साध्या शिवसैनिकाशी (मुळात शिवसैनिक ही कन्सेप्टच औटींनी कधी मान्य केली नव्हती!) चर्चा करुन बाजार समितीचा निर्णय घ्यावा असे त्यांना वाटले नाही. अनेकांचा विरोध असताना हुकुमशाहा सारखं आदेश देत त्यांनी त्यांची भूमिका घेतली. त्यावेळी गोड वाटणारे निलेश लंके यांच्या विरोधात आज औटी उभेच कसे राहू शकतात असा प्रश्न सध्या चर्चेत आहे आणि तो थांबायला तयार नाही. पंधरा वर्षे आमदार राहिलेला आपला नेता अशीही सेटलमेंट करू शकतो या चर्चेने सध्या समर्थकांमध्ये जोर आहे. ‘हम तो डुबेंगे सनम, लेकीन तुमको लेके डुबेंगे’ यानुसार ते स्वत: कोणाला तरी सोबत घेऊन पराभूत होण्यास सिद्ध झाले असल्याचे दिसते. औटी यांची उमेदवारी आणि त्यांना दिले जाणारे मत हे दुसर्या कोणाच्या विजयाची पायरी होणार आहे याचा अंदाज सध्या तालुक्यातून बांधला जात आहे.
तुसडा स्वभाव, निंदानालस्तीत मग्न अन् हुजर्यांच्या फौजेचे सेनापती झालेले हेच विजयराव!
कायम पूर्वग्रहदुषीत स्वभाव! त्यातून गावागावात हुुकुमशहा सारखं वर्तन आणि आदेश देणारे हेच विजयराव आज एकटे का पडलेत हे त्यांनी जसे समजून घेण्याची गरज आहे, तसेच बाकीच्या पुढार्यांनीही त्यातून बोध घेण्याची गरज आहे. विजयरावांनी अपमान केला नाही असा माणूस दाखवा आणि बक्षिस मिळवा, असे आवाहन मागील निवडणुकीत निलेश लंके यांनी केले आणि तेच आवाहन मतदारांना भावले! कारण, प्रत्येक गावात किमान डझनभर आणि वाडी- वस्तीवर किमान अर्धाडझन लोकांचा त्यांनी चौरचौघात पानउतारा केला. सोबतच्या हुजर्यांनी साहेबांचे खरे आणि त्यांचा तो स्वभावच योग्य, असं बैठकीत म्हणायचं! साहेबांनी हळूच हसायचं आणि दुसर्या दिवशी बैठकीतील चर्चेत कोण-कोण विरोधात आहे याचा अंदाज घेत त्यांचा कार्यक्रम अशी दिनचर्या! आज त्यांच्यासोबत कोणीच का राहिले नाही याचे आत्मचिंतन त्यांनी करण्याची आवश्यकता आहे.
तर विजयरावांना २०१९ च्या निवडणुकीत सोडा अगदी पारनेरच्या वेशीत देखील उभा राहता आले नसते!
२०१४ आणि त्यापाठोपाठ झालेल्या २०१९ च्या निवडणुकीनंतर सेनापती बापट पतसंस्थेतील ठेवी मिळणे कठीण झाले. यानंतर ही पतसंस्था नगरमधील ‘भंडारी’ यांना देण्यात आली. भंडारी आणि त्यांच्या सहकार्यांनी सहा-सात महिने कामकाज पाहिले आणि संस्थेत मोठ्या प्रमाणात अनियमीतता असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी हा विषय सोडून दिला. याच दरम्यान, पतसंस्थेच्या माध्यमातून चालू असतारा सुपा एमआयडीसीमधील ‘सूर्यतारा’ पाण्याच्या बाटल्यांचा प्रोजक्ट देखील बंद पडला. रामदास भोसले यांनी या संस्थेत लक्ष घातले. संस्थेत पदाधिकारी म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. यानंतर ही संस्था अडचणीतून बाहेर आली. जर ही संस्था भोसले यांनी अडचणीतून बाहेर आणली नसती तर विजयरावांना २०१९ च्या निवडणुकीत सोडा अगदी पारनेरच्या वेशीत देखील उभा राहता आले नसते!
सेनापती बापट पतसंस्थेचे विजयराव संस्थापक, संस्थेबाबत ओरड होताच हात वर करणारे हेच ते विजयराव!
सेनापती बापट पतसंस्थेच्या माध्यमातून विजयराव औटी यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. वेगवेगळ्या पदांवर त्यांना संधी मिळाली. पतसंस्था चांगली उर्जितावस्थेत चालू होती. तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर संस्थेच्या शाखा झाल्या. मात्र, ठेवीदारांच्या ठेवीचे पैसे योग्य ठिकाणी न गुंतवता त्याचा वापर वेगळ्या कारणासाठी केला गेला आणि संस्था अडचणीत आली. रामदास भोसले यांची संस्थेत एंट्री झाली आणि संस्था पुन्हा पूर्वपदावर आली. मात्र, तालुक्यातील दोन-तीन पतसंस्थांचे घोटाळे समोर आले आणि त्यातून अनेक पतसंस्थांमधील ठेवी काढल्या गेल्या. सेनापती बापट पतसंस्थाही त्यातून सुटली नाही. मोठ्या प्रमाणात ठेवी निघू लागल्याने ताळमेळ बिघडला. त्यातच भोसले आजारी पडले आणि ठेवीदार हवालदिल झाले. काही ठेवीदारांनी संस्थापक असलेल्या विजयरावांकडे धाव घेतली. मात्र, त्यावेळी याच विजयरावांनी या ठेवीदारांना साधे घरात देखील घेतले नाही. गेटवरुनच त्यांना माघारी पाठवताना ‘माझा आणि त्या संस्थेचा काहीच संबंध नाही, तुम्ही चुकीच्या पत्यावर आलात! रामदास भोसलेकडे जा! पुन्हा इकडे येऊ नका,’ अशा स्पष्ट भाषेत त्यांनी अनेकांना सुनावले! भोसले यांनी संस्थेच्या ठेवीदारांचा मेळावा घेतला असता त्यामेळाव्याला जाणे देखील याच विजयरावांनी टाळले!
राज्याचं काय झालं यापेक्षा पारनेरचं काय झालं आणि कोणामुळे झाले हे बोला!
राज्यात अमूक झालं! तमूक झालं! राज्याचा हा नेता असा! तो नेता तसा! राज्याच्या हितासाठी अमूक केले पाहिजे- तमूक केले पाहिजे, असं व्हीडीओच्या माध्यमातून बोलणारे विजयराव काल- परवा दिसले. देशात आणि राज्यात काय चाललंय हे बोलण्यापेक्षा पारनेरमध्ये काय चालू आहे आणि हे चालू असताना मागील पाच वर्षात आपण झोपून का राहिलात याचं उत्तर पारनेरकरांना हवं आहे.
म्हणे, ‘बाबानं कौल दिला अन् साहेब तयारीला लागले’!
करंडी- गणपती फाटा परिसरात टेकडीवर साहेबांचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या शेजारी भोसले साहेबही राहतात! साहेबांच्या बंगल्यात सध्या एक साधू बाबू राहत असून त्यांनी यावेळी औटी साहेब आमदार होणार असं भाकीत वर्तवले आहे. त्यानुसार साहेबांनी अर्ज भरला आणि निवडणूक करत असल्याचे त्यांचे जे काही थोडेफार समर्थक आहेत, ते सांगू लागले आहेत. साहेबांनी अर्ज भरला! त्यानंतर एक- दोन बैठका घेतल्या आणि साहेब फार्म हाऊस आणि पारनेरमधील बंगल्यात तळ ठोकून राहिले. आजही ते तेथेच आहेत. घरात बसून साहेब आमदार होणार असतील आणि त्यासाठी बाबाचं भाकीत जोडीला सांगितले जात असेल तर एकाही पुढार्याने गावागावात सभा घेतल्या! कोणीही मतदारांच्या पाय पडले नसते! थेट एखाद्या बाबाला घरात बसून ठेवले असते! त्या बाबाने इव्हीएम मशिन हॅक करण्याचा मंत्र मारला तर आणि तरच साहेब चार आकडी मतदान पार पाडू शकतील!
… तर भास्कररावांनी विजयरावांची खरडपट्टी काढली असती!
कायम अंधश्रद्धेच्या विरोधात बोलणारे आणि तशी कृती करणारे भास्करराव औटी पारनेरकरांनी आमदार म्हणून निवडले. त्यांनी कथनी आणि कृतीत बदल कधीच होऊ दिला नाही. बाणेदार विचार जपताना डाव्या विचारांचे ते कायम पाईक राहिले. विजयराव यांची पहिल्या टप्प्यातील राजकीय कारकिर्दही सुरुवातीला अशीच! दोन टर्म आमदार झाल्यानंतर तिसर्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांचे डावे विचार बदलू लागले. त्याआधी ते अंधश्रद्धा, देवदर्शन आणि गंडेदोरे- महाराज यांच्या विरोधात कसे आणि काय बोलत होते हे सर्वश्रूत! आज हेच विजयराव अंधश्रद्धेच्या किती आहारी गेलेत हे तालुका पाहत आहे. श्रद्धा असलीच पाहिजे पण अंधश्रद्धा नसावी. आज त्यांचे वडिल भास्करराव हयात असते तर त्यांनी विजयरावांची खरडपट्टी काढली असती.
चौकार मारायला निघाले अन् क्लिनबोल्ड झालेले हेच ते विजयराव!
मागील विधानसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्या सभेत निलेश लंके यांना डावलण्यात आल्यानंंतर मोठे वादंग झाले. त्याच दिवशी लंके यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर शक्तीप्रदर्शन केले. त्याच सभेत औटी समर्थकांनी विजय औटी यांच्यासाठी मोठी गर्दी केली! ढवळपुरी या आदिवासी बहुल पट्ट्यातून त्यावेळी औटी यांचे कट्टर समर्थक असणारे तत्कालीन सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी आदिवासी तरुण- महिलांची मोर्दी गर्दी सभास्थळी आणली. या गर्दीतील तरुणांच्या हाती ‘साहेब चौकार मारणार’, असे फलक होते. पुढे निवडणूक झाली आणि लंके यांच्या गोलंदाजीवर हेच विजय औटी क्लिनबोल्ड झाले. औटींचा चौकार मोठ्या अंतराने हुकला!
जीवाची बाजी लावणार्या शेकडो समर्थकांना वार्यावर सोडून देणारे हेच ते विजयराव!
विजयरावांच्या कथीत संभाव्य चौकाराचे गुणगान गाणार्या ढवळपुरी येथील डॉ. राजेश भनगडे यांना त्या फलकाचा मोठा त्रास झाला. त्या वर्षभरात याच विजय औटी यांनी भनगडे यांची साधी विचारपूस देखील केली नाही! वार्यावर सोडून दिलेल्यांमध्ये एकटे भनगडेच आहेत असे नाही! ही यादी जवळपास पाचशेपेक्षा जास्त निष्ठावानांची निघेल. विधानसभा निकालानंतर मागील पाच वर्षात याच विजय औटी यांनी त्यांच्यासाठी जीवाची बाजी मारणार्यांपैकी कोण- कोण जिवंत आहेत आणि कोण- कोण कोणत्या परिस्थितीत जगत आहेत याची साधी विचारपूस देखील केली नाही.
सुट-बुट अन् कांजीतील कपडे घालून आला की त्याचा पानउतारा करणारे हेच ते विजयराव!
पारनेरच्या वेशीजवळ विजयरावांचे कार्यालय! सकाळी दहाच्या सुमारास ते कार्यालयात यायचे! (आज ते कार्यालय ओस पडलेय!) त्याआधी कार्यालया बाहेर तालुक्यातून आलेले अनेकजण असायचे! साहेब आले की दरबार सुरू व्हायचा! त्यांच्यासमोर चांगले कपडे घालून सुटाबुटातील कोणी आला की त्याचा ते शेलक्या शब्दात बोलून करेक्ट कार्यक्रम करणार! भरगर्दीत पानउतारा झाल्यानंतर तो कार्यकर्ता ‘झक मारली अन् इकडे आलो’, असं पुटपुटतच निघून जायचा!
‘तिकडे कामधंदे नाहीत का?, जा घरी’, असं सुनावणारे हेच ते विजयराव!
आपल्या तालुक्याचा आमदार आहे आणि कार्यालयात ते आहेत, असं समजलं की मुंबई- पुण्यासह गावागावातील कार्यकर्ते, तरुण विजयरावांच्या कार्यालयाकडे जायचे! ‘काय विशेष, बोला काय काम होतं’, असा प्रश्न विजयराव त्याला विचारायचे! समोरच्या तरुणाने ‘तुम्ही कार्यालयात असल्याचे समजले म्हणून सहज आलो’, असं उत्तर देताच विजयराव त्याच्यावर खेकसले नाहीत असं झालं नाही! इथे काय सर्कस चालू आहे का? तमाशाचा तंबू वाटला की काय? कामधंदे पहा अन् निघा! मला माझी कामे करु द्या, हे त्यांचं ठरलेले उत्तर! आज तेच विजयराव पाचव्यांदा मतांचा जोगवा मागत असले तरी त्यांनी सभा घेणे टाळलेय! यातच सारे काही आले आहे!