अहमदनगर | नगर सह्याद्री
दिल्लीगेट वेशीजवळ मंगळवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या एका स्कॉर्पिओने दुचाकी वरील दोघांना जोराची धडक दिली. यात दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान घटनेनंतर संतप्त नागरिकांनी एकत्र येऊन पोलिसांची स्कॉर्पिओ अडवून धरली. जमाव आक्रमक झाल्यानंतर गाडीची तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
शहरात पंतप्रधानांच्या सभेसाठी बंदोबस्ताला जिल्हाभरातून पोलिस अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात बाहेरून वाहने नगर शहरात आलेली आहेत. रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांची एक स्कॉर्पिओ (एमएच ४३ जी २७०) सिद्धीबागेकडून दिल्लीगेटच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना समोरून येणार्या दुचाकीला (एमएच १७ झेड ४३८३) त्यांनी जोराची धडक दिली. या दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. मोठा जमाव जमल्याने त्यांनी पोलिसांची स्कॉर्पिओ अडवून धरली. जमाव आक्रमक झाल्याने गाडीची तोडफोडही करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली व तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.