रायगड । नगर सहयाद्री:-
रायगडच्या कर्जतमध्ये पोलिस ठाण्यामध्येच दोन गटामध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटाने एकामेकांना बेदम मारहाण करत धारधार शस्त्रांनी वार केले. या घटनेमध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पोलिस समोर असताना देखील दोन्ही गट राडा करतच राहिले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्जत पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी कर्जतमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली. महत्वाचे म्हणजे ही हाणामारी कर्जत पोलिस ठाण्यात झाली. या हाणामारीत कोयत्यांचा वापर करण्यात आला. तीन तरुणांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या कोयता हल्ल्यात तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र कर्जतमध्ये पाहायला मिळाले. पोलिसांच्या समोरच कोयता हल्ला करण्यात आल्यामुळे कर्जतमध्ये खळबळ उडाली आहे. या हाणामारीमध्ये महिला देखील होत्या. दोन कुटुंबातील हा वाद आहे. हा वाद ऐवढा विकोपाला गेला की त्यांनी पोलिस ठाण्यातच राडा केला. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पराविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कडाव वडवली गावात घरासमोरील कठडा काढण्यास सांगितले यावरून दोन कुटुंबात हा वाद सुरु झाला.
दोन्ही गट पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर गावात झालेला वाद पोलिस ठाण्यात पुन्हा उफाळून आला. दोन्ही गट एकमेकांना भिडले. यावेळी कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रोशन मराडे, मोहन मराडे आणि प्रथम मराडे हे तिघे जण गंभीर जखमी झाले. यापैकी मोहन मराडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारांसाठी एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या हाणामारीचे व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.