अहमदनगर। नगर सहयाद्री
नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणी भल्या पहाटे एव्हीआय इंजिनिअरींग कंपनीच्या संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. कर्ज रकमेचा गैरवापर करून दुसऱ्या बँकेचे कर्ज फेडले. यासह दुसऱ्या कर्जदाराच्या खात्यातून त्याच्या खात्यात काही रक्कम वर्ग झाल्याचेही समोर आले होते.
एव्हीआय इंजिनिअरींग कंपनीचा संचालक अविनाश प्रभाकर वैकर यांने २० लाख रुपये काढून ते गुन्ह्यातील मुख्य संशयित स्व. दिलीप मनसुखलाल गांधी यांना रोख स्वरूपात दिले व १० लाख रुपये बँकेचा अधिकारी संशयित आरोपी घनश्याम उर्फ हेमंत अच्युत बल्लाळ याला दिले असल्याची कबुली न्यायालयात काल, गुरूवारी दिली.
बँकेत २९१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याप्रकरणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी वैकर याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती, काल त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले होते.
बैकर याने एव्हीआय इंजिनिअरींग वर्क्सच्या नावे व्यवसायाकरिता माल खरेदी विक्री, तसेच व्यवसायासाठी खेळते भांडवल म्हणून वेळोवेळी दोन कोटी ६७ लाख रुपये कर्ज घेतले. यातील काही रक्कम दुसन्या बँकेचे कर्ज फेडण्यासाठी, काही रकम स्वतःच्या नावे मुदतठेवीमध्ये गुंतवणुकीसाठी, तर काही रकम वैयक्तिक खरेदीसाठी कर्ज रकमेचा गैरवापर केला आहे.
२० लाख स्व. दिलीप गांधी यांना दिल्याची कबुली
मंजूर कर्ज रकमेतून २० लाख रूपये हे रोख काढून ते स्व. गांधी यांना दिले असल्याची कबुली दिली. तसेच कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी बँकेचा अधिकारी संशयित आरोपी घनश्याम उर्फ हेमंत अच्यूत बल्लाळ यास नगर अर्बन बँकेच्या मंजूर हाउसिंग लोन रकमेतून सहा लाख रूपये हे त्याच्या बँक खात्यावर वर्ग केल्याचे व चार लाख रूपये असे १० लाख रूपये दिले असल्याची कबूली वैकर यांनी दिली आहे.