spot_img
महाराष्ट्रपारनेर तालुक्यात शासनाच्या अभियानाचे 'तीन तेरा'; कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ

पारनेर तालुक्यात शासनाच्या अभियानाचे ‘तीन तेरा’; कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
ग्रामीण विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या पंचायतराज व्यवस्थेची विचारधारा देशाला देणाऱ्या पारनेर तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने या अभियानाचे तालुक्यात ‘तीनतेरा’ वाजल्याचे चित्र आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी नाराजी व्यक्त करत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची परखड शब्दांत कानउघाडणी केली.

मंगळवारी (दि. ९ सप्टेंबर) पारनेर येथील गणेश मंगल कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समितीतर्फे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेत भंडारी बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी दयानंद पवार, चांभुर्डीकर महाराज, सरपंच बाजीराव दुधाडे, रोजगार कक्षप्रमुख एपीओ कारखिले, ग्रामविकास अधिकारी शिवाजी खामकर आदी उपस्थित होते. मात्र, तालुक्याचे खासदार व आमदार या महत्त्वाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या विकासाबाबतच्या आस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

पंचायतराज ही लोकशाहीचा पाया असून, स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला आहे. गावाचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, सर्वांगीण प्रगती साधणे अपेक्षित आहे. मात्र, समाजसेवक अण्णा हजारे व आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या पारनेर तालुक्यात या अभियानाला उदासीन प्रतिसाद मिळत असल्याचे भंडारी यांनी नमूद केले. तालुक्यात तक्रारींचे प्रमाणही जास्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सीओ भंडारी म्हणाले, प्रत्येक नागरिक व घटक या अभियानाशी जोडला गेल्यासच यश मिळेल. गावात हजारो-करोडो रुपयांचा निधी येऊ शकतो, पण त्यासाठी सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांनी सक्रिय राहणे गरजेचे आहे. त्यांनी करवसुलीवर लक्ष देणे, गावचा विकास साधणे आणि पर्यावरण रक्षणाच्या सूचना केल्या. ग्रामपंचायतींना खर्चाची मुभा असल्याने त्याचा योग्य वापर करावा, असेही ते म्हणाले.

दरम्यान, निवडणूक काळात मतांसाठी सक्रिय असणारे नेते या नियोजित कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने उपस्थितांमध्ये त्याबाबत चांगलीच चर्चा रंगली. तालुक्याच्या विकासासाठी नेत्यांची अनास्था आणि अभियानाला मिळणारा थंड प्रतिसाद यामुळे पारनेर मागे पडत असल्याची खंत व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...