अहमदनगर। नगर सहयाद्री
घराला कुलूप लावून कुटुंबासह नातेवाईकांच्या साखरपुड्याला गेलेल्या व्यापार्याचे घर चोरट्यांनी फोडले. तिजोरीत ठेवलेले तब्बल २० तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख ५० हजारांची रोकड चोरून नेले. एमआयडीसी जिमखाना जवळील माताजीनगर येथे शनिवारी (दि. ३०) रात्री ८ ते ११.४५ सुमारास ही घटना घडली.
या बाबत सुजय सुनील गांधी (वय ३३) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने गुरूवारपासून (दि. २८) रविवारपर्यंत (दि. ३१) नगर शहरातील केशर गुलाब मंगल कार्यलयात कार्यक्रम होते. शनिवारी (दि.३०) रात्री साखरपुडा असल्याने गांधी कुटुंबीय रात्री आठच्या सुमारास तेथे गेले होते.
कार्यक्रम आटोपून रात्री ११.४५ च्या सुमारास घरी आले असता त्यांना घराचे गेट उघडे दिसले. त्यांनी आत जावून पाहिले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडलेले दिसले. ते घरात गेले असता हॉलमधील शोकेश कप्प्यात ठेवलेली लोखंडी तिजोरी तेथे दिसली नाही. त्यानंतर घरातील इतर रूम पाहिल्या असता तेथेही सामानाची उचकापाचक केल्याचे दिसून आले.
चोरट्यांनी नेलेल्या तिजोरीत तब्बल २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन लाख ५० हजार रूपये असा ऐवज असल्याचे गांधी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना फोन करून माहिती दिली. रात्र गस्तीवरील पथकाने घटनास्थळी पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ पथकालाही पाचारण केले. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी ही पथकासह घटनास्थळी भेट दिली.